राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ऋषभ शेट्टी आणि दिग्गज दिग्दर्शक संदीप सिंग यांनी 'द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज' या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कांतारा सिनेमाद्वारे ऋषभ शेट्टीने त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कांतारा सिनेमातील ऋषभचा अभिनय आणि दिग्दर्शन सर्वांच्याच पंसतीला उतरलं होतं. कांतारा- 2 हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जय हनुमान (2026) आणि द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज (2027) हे सिनेमे रिलीज होतील.
मेरी कोम, सरबजीत, वीर सावरकर आणि शॉर्ट फिल्स सफेद यासारखे चित्रपट देणारा संदीप सिंग या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमा 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
Our Honour & Privilege, Presenting the Epic Saga of India's Greatest Warrior King – The Pride of Bharat: #ChhatrapatiShivajiMaharaj. #ThePrideOfBharatChhatrapatiShivajiMaharaj
— Rishab Shetty (@shetty_rishab) December 3, 2024
This isn't just a film – it's a battle cry to honor a warrior who fought against all odds, challenged… pic.twitter.com/CeXO2K9H9Q
ऋषभने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, आपला सन्मान, भारताच्या महान योद्ध्याची महाकथा सादर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट हा दिग्दर्शक म्हणून संदीपचा पहिलाच फिचर सिनेमा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा पडद्यावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक ग्राफिक्सचा वापर करण्यात येणार आहे.
ऋषभ शेट्टीने याबाबत म्हटलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हा शब्दांपलीकडचा सन्मान आहे. ते एक राष्ट्रीय नायक आहेत, ज्यांचा प्रभाव इतिहासाच्या पलीकडे आहे आणि त्यांची कथा पडद्यावर आणताना मला खूप अभिमान वाटेल."
संदीप सिंहने म्हटलं की, "या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी हा माझा पहिला आणि एकमेव पर्याय होता. तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य, आत्मा आणि शौर्याचे प्रतीक आहे. हा चित्रपट माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे. सिनेमा 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. "द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज" हा बहुभाषिक चित्रपट आणणे ही माझ्यासाठी गौरवाची आणि सन्मानाची गोष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world