अमोल सराफ, प्रतिनिधी
Shegaon Kachori : संतनगरी शेगावात येणारा प्रत्येक भाविक श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगावची प्रसिद्ध कचोरी खाल्ल्याशिवाय कधीही परतत नाही. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात जिची चव प्रसिद्ध आहे, त्या शेगावच्या कचोरीची आता थेट अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तपासणी केली आहे.
एफडीएने अचानक शेगाव कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने जप्त केल्यामुळे येथील कचोरी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाविकांना मिळणारे हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ नेमके किती शुद्ध आणि सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी प्रशासनाने थेट पावले उचलली आहेत.
का केली तपासणी?
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डीतील प्रसिद्ध पेढ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट शेगावची प्रसिद्ध कचोरी एफडीएच्या रडारवर आली आहे.
या मोठ्या कारवाईमुळे राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रसिद्ध आणि भाविकांची श्रद्धा असलेल्या ठिकाणी मिळणारे अन्न खात्रीलायक आणि दर्जेदार असावे, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यात कॉर्पोरेट छळाचा बळी, TCS च्या 2 महिला अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून IT इंजिनिअरचा गळफास! )
कचोरीच्या कच्च्या मालाचे नमुने जप्त
शेगाव कचोरीमध्ये नेमके कोणते घटक आणि पदार्थ वापरले जातात, याची अचूक माहिती घेण्यासाठी एफडीएच्या पथकाने स्थानिक कचोरी केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी कचोरी तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, मैदा, मसाले आणि इतर कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले.
हे सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार असून, त्यात कोणतीही भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडून थेट आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: 48 वार करून महिलेचा खून, नंतर स्वतःवर केले 8 वार; बदलापुरातील घटनेने सर्वच सून्न, वाचा सविस्तर )
संचालकांनी दिलं स्पष्टीकरण
मागील 76 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात शेगाव कचोरीने आपली एक वेगळी चव आणि नावलौकिक टिकवून ठेवला आहे. ज्या प्रमुख कचोरी सेंटरचे नमुने एफडीएने तपासणीसाठी नेले, त्या प्रसिद्ध तीरतमल कचोरी सेंटरचे संचालक भूपेश शर्मा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही कोणतीही विशेष कारवाई नसून दर 6 महिन्यांनी होणारी एक नियमित (रुटीन) तपासणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, एफडीएच्या वतीने वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे आम्ही ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून नेहमीच काटेकोर पालन करतो, असेही त्यांनी सांगितले.
ग्राहकांचा विश्वास कायम
या संपूर्ण तपासणी मोहिमेदरम्यान ग्राहकांनी आणि भाविकांनी शेगाव कचोरीच्या विश्वासार्हतेवर पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. आम्ही वर्षानुवर्षे येथे येत असून या चवीवर आणि दर्जावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान, एफडीएच्या या कडक भूमिकेमुळे भविष्यात भाविकांना अधिक दर्जेदार, शुद्ध आणि खात्रीलायक खाद्यपदार्थ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारी तपासणीनंतर कचोरीच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्यास, भाविक कोणत्याही शंकेशिवाय आणि डोळे बंद करून या चवदार कचोरीचा आनंद घेऊ शकतील.