Badlapur Murder: बदलापूरमध्ये झालेल्या महिला आणि ओला चालकाच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला गूढ वाटणाऱ्या या घटनेमागचे मुख्य कारण पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असून, केवळ संशयातून आणि फोन व्यस्त येण्याच्या वादातून हा थरार घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेने संपूर्ण बदलापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील मृत महिला मनिषा भोसले यांचे पती घाटकोपर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. सुमारे चार महिन्यांपूर्वी मनिषा भोसले यांनी बदलापूरहून घाटकोपरला जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. या प्रवासादरम्यान त्यांची ओळख ओला चालक ज्योतिबा शिंदे याच्याशी झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मात्र, हीच मैत्री पुढे एका भीषण हत्याकांडात बदलेल याची कोणालाही कल्पना नव्हती. गेल्या दहा दिवसांपासून या दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून सातत्याने वाद होत होते.
( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )
काय होतं वादाचं कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला चालक ज्योतिबा शिंदे हा मनीषा यांना सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मनिषा यांचा फोन वारंवार व्यस्त येत असल्याने ज्योतिबाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. माझ्याशिवाय तू इतर कोणाशी फोनवर बोलतेस, असा जाब विचारत ज्योतिबाने मनिषा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. फोनवर सुरू असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की ज्योतिबाने थेट टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
मुलासमोरच आईवर 48 वार
हाच राग मनात धरून ज्योतिबा शिंदे घाटकोपरहून थेट बदलापूरला पोहोचला. बदलापूर पूर्वेतील जीवेलीगाव परिसरात मनीषा भोसले यांच्याशी त्याचा पुन्हा वाद झाला. या वादातून संतापलेल्या ज्योतिबाने मनीषा यांच्यावर धारदार शस्त्राने एकामागून एक तब्बल 48 वार केले. हा संपूर्ण थरार मनीषा यांच्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलासमोर घडला. या भीषण हल्ल्यात मनीषा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Dr. Sejal Pawar: मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सची खिल्ली उडवणाऱ्या मुंबईच्या डॉक्टरवर होणार मोठी कारवाई )
स्वतःवर केले 8 वार
मनिषा यांची हत्या केल्यानंतर ज्योतिबा शिंदे याने त्याच धारदार शस्त्राने स्वतःवरही 8 वार करून घेतले. स्वतःवर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यात ज्योतिबाचाही मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी या दोघांचे रक्ताळलेले मृतदेह जीवेलीगाव परिसरातील रस्त्यावर आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
लहान मुलाच्या साक्षीने उलगडले गुपित
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. यावेळी मनीषा यांच्या 3 वर्षांच्या लहान मुलाने पोलिसांना ड्रायव्हर काकाने आईला मारले, अशी महत्त्वाची माहिती दिली. या लहान मुलाच्या सांगण्यावरून पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आणि या दुहेरी मृत्यू प्रकरणामागचे धक्कादायक सत्य समोर आले. सध्या बदलापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world