सुनील दवंगे, अहिल्यानगर:
Shirdi Crime: देशभरातून लाखो भाविक ज्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात… त्या शिर्डीत आता अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील दोन अल्पवयीन मुलांना पळवून आणत त्यांच्याकडून भीक मागवणे आणि कचरा गोळा करण्याचे काम करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनच्या मदतीनं या दोन्ही मुलांची सुटका करण्यात आली असून पोलिसांच्या सहाय्यानं त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे शिर्डीत बालतस्करी किंवा बालशोषण करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत का…? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
साईबाबाच्या दरबारात धक्कादायक प्रकार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी.. देश-विदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आणि दानधर्मही करतात. मात्र याच गर्दीचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काहीजण अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचं चित्र आता समोर येऊ लागले आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील दोन लहान मुलांना पंधरा दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं शिर्डीत आणल्याची माहिती समोर आली आहे. या मुलांकडून भीक मागणे तसेच कचरा गोळा करण्याचं काम करून घेतलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही दोन्ही मुलं शिर्डीतील एका भागात कचरा गोळा करताना आढळली. त्यांची परिस्थिती संशयास्पद वाटल्यानंतर मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर एलम यांनी तत्काळ हस्तक्षेप करत या मुलांना रेस्क्यू केले. यानंतर मुलांना शिर्डीतील एका आश्रमात सुरक्षित ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.
मोठं रॅकेट असण्याची शक्यता
विशेष म्हणजे या दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी मध्यप्रदेशातील स्थानिक पोलिसांकडे मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही मुलांचा शोध लागत नव्हता आणि अखेर हीच मुलं थेट शिर्डीत सापडल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. शिर्डीत बाहेरच्या राज्यातून मुलांना आणलं जातंय का? भाविकांच्या दानधर्माचा गैरफायदा घेत मुलांकडून भीक मागवली जातेय का? आणि मंदिर परिसरात काही टोळ्या सक्रिय आहेत का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण जर दोन अल्पवयीन मुलांना थेट दुसऱ्या राज्यातून शिर्डीत आणलं जाऊ शकत असेल. तर यामागे मोठं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world