- खासदार कल्पनाराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा खरा राष्ट्रपिता म्हटले आहे
- भारतीय चलनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा, अशीही त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे
- साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा जिल्हा आहे असं ही त्या म्हणाल्या
सुनिल दवंगे
देशाचे खरे राष्ट्रपिता हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाय नोटांवर ही त्यांचा फोटो हवा अशी मागणी कल्पनाराजे भोसले यांनी केली आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर परखड भूमिका मांडली. देशाचे खरे राष्ट्रपिता छत्रपती शिवाजी महाराज असायला हवेत, तसेच भारतीय चलनी नोटांवरही त्यांचाच फोटो असावा, अशी मागणी त्यांनी केली. साताऱ्याच्या राजकारणापासून ते सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी आपली मतं मांडली. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरही त्यांनी स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. देशाचे खरे राष्ट्रपिता छत्रपती शिवाजी महाराज असायला हवेत. कोणालाही राष्ट्रपिता ही उपाधी देण्यापेक्षा शिवाजी महाराजांना तो मान मिळायला हवा. तसेच भारतीय चलनी नोटांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा, असे त्यांनी म्हटले आहे. सातारा हा शिवरायांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. त्याला एनसीपीचा किंवा चव्हाण साहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला म्हटले जाते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा केली असती, असेही त्यांनी म्हटले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. अशा गुन्हेगारांना कठोर आणि तातडीने शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्याच्या न्यायप्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्याय हा झटपट मिळाला पाहीजे. त्यासाठी विलंब लागायला नको असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाजी महाराज असते तर त्यांना अशा गुन्हेगारांना तोफेच्या तोंडी दिलं असतं.
लोकांनी संपूर्ण कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. देशात लोकांनी क्रांती करायला हवी. अत्याचार आता किती सहन करायचे असं ही त्या म्हणाल्या. कोर्ट कचेऱ्या कशासाठी आहेत. आरोपींना चौकात फासावर लटकवलं पाहीजे. असं केलं तर त्या भितीने विकृती निर्माण होणार नाही. दरम्यान राष्ट्रपिता म्हणून तुम्ही कोणाला ही उपाधी देता. कुणाचे ही नोटांवर फोटो छापता यावर कल्पनाराजे यांनी नाराजी व्यक्त केली.