Shirdi News : चित्रपटाच्या शूटिंगसाठी साई बाबांच्या समाधीवरच..., ग्रामस्थ संतापले, 'ती' दृश्य वगळण्याची मागणी

शिर्डीत साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘तेरा साई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘तेरा साई' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिर्डीत घडलेल्या एका प्रसंगामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते संजय मिश्रा हे शूटिंगदरम्यान थेट साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसल्याचं समोर आलं आहे. मंदिराच्या परंपरा आणि नियमांच्या विरोधात हा प्रकार झाल्याचा आरोप करत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

अभिनेता थेट समाधी चौथऱ्यावर...

शिर्डीत गेल्या दोन दिवसांपासून दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या ‘तेरा साई' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा साईबाबांची भूमिका साकारत आहेत. मात्र साई समाधी मंदिरात एका दृश्याचं चित्रीकरण करताना संजय मिश्रा हे थेट साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसल्याचं समोर आलं. त्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ग्रामस्थ आणि साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. साईबाबा संस्थानच्या परंपरेनुसार समाधीवर केवळ अधिकृत पुजारी आणि लाल वस्त्रधारी चोपदार यांनाच जाण्याची परवानगी आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा संस्थानचे पदाधिकारी यांनाही समाधीवर बसण्याची किंवा चढण्याची परवानगी नसताना चित्रपटाच्या शूटिंगसाठी हा अपवाद का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

संबंधित चित्रपटाचे दिग्दर्शक पलाश मुच्छल यांनी सार्वजनिक माफी मागावी, वादग्रस्त दृश्य चित्रपटातून वगळण्यात येईल याबाबत साईबाबा संस्थानला लेखी हमी द्यावी आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर भविष्यात मंदिर परिसरात कोणत्याही चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी धार्मिक परंपरा आणि संस्थानचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्याचे आदेश...

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप केला आहे. शूटिंगदरम्यान ज्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला, त्यासंबंधित अधिकाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस' बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण घटनेचा अहवाल मागवून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता साईबाबा संस्थान आणि जिल्हा प्रशासन पुढे कोणती कारवाई करणार, याकडे राज्यभरातील साईभक्तांचं लक्ष लागलं आहे.

साईबाबांच्या समाधीबाबतचे नियम आणि परंपरा अत्यंत पवित्र मानल्या जातात. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या नियमांमध्ये शिथिलता का दाखविण्यात आली, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. ग्रामस्थांनी माफी, लेखी हमी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या वादाचे पडसाद केवळ शिर्डीपुरते मर्यादित न राहता जगभर उमटण्याची शक्यता आहे.


Topics mentioned in this article