सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांकडून मौलवान दान केलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. दरम्यान एका दानशूर भक्ताने साईबाबांना अनोखं दान केलं आहे. या भक्ताने बाबांसाठी तब्बल २४ लाखांचं दान केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या दानशूर भाविकाने स्वत:ची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.
साईबाबांच्या आरतीवेळी श्रृंगारात नव्या वस्तूची भेट...
शिर्डीच्या साईदरबारात दानशूर भक्तांकडून होणाऱ्या मौल्यवान दानाचा ओघ कायम असून, आज दिल्लीतील एका साईभक्ताने साईबाबांना नॅचरल डायमंडने जडवलेला सुवर्ण ब्रोच अर्पण केला आहे. सुमारे 80 ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या या ब्रोचवर मौल्यवान रत्न आणि हिरे जडवण्यात आले असून या ब्रोचची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. साईबाबांच्या आरतीवेळी दररोज करण्यात येणाऱ्या श्रृंगारादरम्यान हा सुवर्ण रत्नजडीत ब्रोच साईबाबांना परिधान करण्यात येणार आहे.
दानशूर भक्ताची ओळख गुप्त ठेवली...
विशेष म्हणजे, या भाविकाने केवळ सुवर्ण ब्रोच नव्हे तर साई संस्थानला नऊ लाख रुपयांचे रोख दान देखील दिले आहे. त्यामुळे या दानाची एकूण रक्कम जवळपास 24 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र एवढे मोठे दान करूनही संबंधित भाविकाने आपली ओळख गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला असून, नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. श्रद्धा, भक्ती आणि साईबाबांप्रती असलेली निस्सीम आस्था यामुळेच शिर्डीच्या साईदरबारात आजही अशा दानशूर भक्तांची संख्या मोठी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.