Shirdi News : लालपरी थांबली नाही, एक चूक अन् ST च्या चालक-वाहकांवर कारवाईची टांगती तलवार..

शिर्डीजवळील सावळी विहीर येथे झालेल्या भीषण अपघातावेळी जखमींच्या मदतीसाठी न थांबणाऱ्या एसटी चालक आणि वाहकांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shirdi News : शिर्डीजवळील सावळी विहीर येथे झालेल्या भीषण अपघातावेळी जखमींच्या मदतीसाठी न थांबणाऱ्या एसटी चालक आणि वाहकांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातस्थळी जखमी प्रवाशांना मदत करण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप झाल्यानंतर आता सासवड बस डेपोकडून अंतरीम चौकशी सुरू करण्यात आली असून गोपनीय अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. NDTV मराठीने ही बातमी प्रदर्शित केल्यानंतर आता या प्रकरणात कारवाईची चक्र फिरू लागली आहेत.  

सासवड बस डेपोकडून अंतरीम चौकशी सुरू

गेल्या आठवड्यात लालपरी आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात अनेक जखमी आणि प्रवासी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, घटनास्थळी आलेल्या सासवड डेपोच्या एसटी बसने मदतीसाठी न थांबता हुलकावणी देऊन पुढे गेल्याचा आरोप करण्यात आला होता. अपघाताच्या वेळी मदत करणे गरजेचे असताना संबंधित चालक आणि वाहक यांनी बस प्रासंगिक करारावर असल्याचे कारण देत तिथे न थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. मात्र या प्रकारानंतर आता सासवड बस डेपोकडून अंतरीम चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित घटनेचा गोपनीय अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shirdi News : रस्त्यावर रक्ताचा सडा अन् साईभक्तांचा आक्रोश; मदतीऐवजी लालपरीने दाखवली पाठ, नागरिकांचा संताप

अपघातावेळी मदत करा, असे आवाहन प्रशासन आणि शासनाकडून वारंवार केले जाते. मात्र लालपरीच्याच मदतीला शासनाचीच लालपरी न थांबल्याचा मुद्दा NDTV मराठीने उचलून धरल्यानंतर आता या प्रकरणात हालचालींना वेग आला आहे. सध्या शिर्डी बस स्थानक प्रमुख तसेच सासवड येथील प्रवासी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर चालक आणि वाहकावर कारवाई केली जाणार असल्याचे सासवड बस डेपोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Topics mentioned in this article