Shirdi News: गुरुपौर्णिमेनिमित्त साईचरणी 1 कोटींचा सुवर्ण मुकुट! आंध्र प्रदेशातील भक्ताकडून नवरत्नजडित भेट

Shirdi News: गुरुपौर्णिमेच्या पावन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी तब्बल 1 कोटी रुपये मूल्याचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची मोठी उत्सुकता आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. या पावन पर्वाचे औचित्य साधून एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांची अनमोल सुवर्ण भेट अर्पण केली आहे. आंध्र प्रदेशातील साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना सुमारे 642 ग्रॅम वजनाचा आकर्षक सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला आहे.

नवरत्न आणि उत्कृष्ट कारागिरी

साईबाबांना आपले गुरुस्थान मानणाऱ्या श्रीनिवासन राव यांनी अर्पण केलेला हा मुकुट अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट कारागिरीचा नमुना आहे. या मुकुटाचे एकूण वजन 642 ग्रॅम असून त्याचे बाजारमूल्य सुमारे 1 कोटी रुपये आहे. मुकुटावर सूर्य, चंद्र, नवग्रह तसेच व्याल मूर्तींचे अत्यंत देखणे नक्षीकाम करण्यात आले आहे. या सुवर्ण मुकुटात विविध नवरत्ने जडवण्यात आली असून यामुळे साईबाबांच्या अलंकाराची शोभा आणखी वाढणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

संस्थानकडून मुकूट देणार्‍या भक्ताचा सत्कार

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्त मल्लादी श्रीनिवासन राव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि सुवर्ण मुकुट अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आला. संस्थानच्या नियमानुसार आवश्यक असणारी सर्व अधिकृत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या दैनंदिन अलंकारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साईचरणी अर्पण झालेल्या या 1 कोटींच्या भव्य दानाची सध्या शिर्डीसह सर्व साईभक्तांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
 


Topics mentioned in this article