Shirdi News : दरवर्षी शिर्डीतील साईबाबांच्या चरणी मोठं दान होत असतं. केवळ राज्यभरातीलच नाही तर देशभरातील भाविक बाबांच्या दर्शनाला येत असतात. यंदा शनिवारी-रविवारला लागून प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केल्याचंही समोर आलं आहे.
साईबाबांना दान केला सोनं-हिऱ्याने मढलेला मुकूट...
शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारी आज दानाचा अक्षरशः पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. दिवसभरात दोन भाविकांनी साईबाबांच्या चरणी तब्बल 3 कोटी 18 लाखांच महादान केलंय. अमेरिकेतील अनिवासी भाविकानं साईबाबांना तब्बल सव्वा कोटींचा सोनं आणि हिऱ्यांनी मढलेला मुकूट अर्पण केलाय तर एका बँकेनं आपल्या सीएसआर फंडातून मेडिकल सुविधेसाठी 1 कोटी 93 लाख रुपयांची देणगी साईबाबा संस्थानला दान केलंय.
प्रजासत्ताक दिन आणि शनिवार-रविवार अशा तीन दिवसांच्या सलग सुट्यांमुळे साईनगरी भाविकांनी फुलून गेली आहे. त्यातच सामान्य भाविकांचे देखील दान होत असताना आज दोन दानशूर भाविकांनी साईंना भरभरुन दान दिलंय. साईबाबा मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, तसेच बाबांना एका हातानं दिलं तर बाबा हजारो हातानं भरभरुन देतात अशी भाविकांची धारणा असल्यानं दिवसेंदिवस साईंना मोठ्या प्रमाणात दान दिलं जातंय. नवर्षानिमित्तानेही साईबाबांच्या चरणी मोठं दान करण्यात आलं होतं. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या नऊ दिवसांच्या काळात तब्बल आठ लाख भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतल. या काळात भाविकांनी साईबाबांच्या झोळीत २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपयांचे महादान अर्पण केलं होतं.