shivaji maharaj jayanti 2026 : निश्चयाचा महामेरु.. बहुत जनांसी आधारु... अखंड स्थितीचा निर्धारू... श्रीमंत योगी... महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी एक गाण कायम ऐकायला मिळतं. कविराज भूषण यांनी लिहिलेलं हे गाणं ऐकताना आजही अंगावर काटा उभा राहतो. मात्र या गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
इंद्र जिमि जंभ पर....
१. इंद्र जिमि जंभ पर, बाड़व सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज है।
- ज्याप्रमाणे इंद्राचे वर्चस्व जंभासुर राक्षसावर आहे, ज्याप्रमाणे समुद्रातील अग्नी (बडवानल) पाण्याचा नाश करतो, आणि ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांनी अहंकारी रावणाचा नाश केला.
२. पौन बारिवाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है।
- ज्याप्रमाणे वारा ढगांना विखुरतो, ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी कामदेवाचा (रतिचा पती) भस्म केला, आणि ज्याप्रमाणे परशुरामाने (द्विजराज) सहस्रार्जुनाचा अंत केला.
३. दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है।
- ज्याप्रमाणे जंगलातील वणवा झाडांना जाळून टाकतो, ज्याप्रमाणे चित्ता हरणांच्या कळपावर तुटून पडतो, आणि ज्याप्रमाणे हत्तीवर सिंहाचे (मृगराज) नियंत्रण असते...
४. तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों म्लेंच्छ बंस पर, सेर सिवराज है।
- ज्याप्रमाणे प्रकाशाचा एक किरण अंधाराचा नाश करतो, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, अगदी त्याचप्रमाणे या अत्याचारी म्लेंच्छ वंशावर (मुघल सत्तेवर) व्याघ्राप्रमाणे 'शिवराज' भारी आहेत.
कवीने शिवाजी महाराजांची तुलना प्रत्यक्ष देव (इंद्र, शिव, राम, कृष्ण) आणि निसर्गातील सर्वात शक्तिशाली घटकांशी केली आहे. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीला शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे रोखले आणि त्यांच्यात असलेला दरारा किती मोठा होता, याचे हे वर्णन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world