अमजद खान, मुंबई: काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी हेमंत जोशी यांचे पार्थिव ज्या शवपेटीत आणले गेले. ती शवपेटी जोशी यांच्या अंत्यसंस्कारानंतर डोंबिवलीतील शिवमंदीर स्मशानभूमीत तशीच एका ठिकाणी कोपऱ्यात पडून आहे. तिची अद्याप विल्हवाट लावण्यात आलेली नाही. हा भोंगळ कारभार लाजिरवाणा असल्याचे ट्वीट शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून प्रशासनावर निशाणा साधत त्यांनी केडीएमसीचा भोंगळ कारभार उघड केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशातील 20 नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशात विविध ठिकाणी निरदर्शने करुन या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचे पार्थिक विमानाने डोंबिवलीत आणले गेले.
त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी समस्त डोंबिवलीकर भागशाळा मैदानात एकत्रित जमले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी त्यांच्या तीव्र भावनाही देखील मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या. त्यानंतर तिघांच्या पार्थिवावर डोंबिवलीच्या स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार पार पडले असले तरी ज्या शवपेटीतून हेमंत जोशी यांचे पार्थिव स्मशानात आणले गेले.
ती शवपेटीत अद्याप स्मशानात पडून आहे. तिची अद्याप विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. या भोंगळ कारभारावर शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी बोट ठेवले आहे. या भोंगळ कारभाराबाबत केडीएमसीला जबाबदार धरले आहे.
दरम्यान, डोंबिवलीत स्मशान भूमीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून लहान मुलांकडून लाकडे वाहून नेण्याचे काम केले जात असल्याचे उघडकीस आले आहे, ज्याचा व्हिडिओही माध्यमांवर व्हायरल होत आहे. डोबिंवलीतील शिवमंदीर स्मशान भूमीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली असून कमी पैशात मुलांकडून काम करुन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.