अमोल गावंडे, बुलढाणा
वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड सध्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पक्षाने नुकतीच त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर त्यांनी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक संवाद बैठक घेतली. या बैठकीत स्टेजवर लावलेल्या बॅनरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बॅनरवरील 'गहाळ' फोटो
या संवाद बैठकीच्या बॅनरवर फक्त आमदार संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचे फोटो होते. विशेष म्हणजे, बॅनरवर पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो नव्हता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही छायाचित्र नसल्यामुळे संजय गायकवाड यांच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
(नक्की वाचा- Sanjay Raut: जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? संजय राऊतांनी का व्यक्त केली चिंता?)
पक्षाच्या मेळाव्यात किंवा बैठकांमध्ये वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव आणि चिन्ह बॅनरवर असणे हा एक अलिखित नियम आहे. मात्र, या नियमाचे पालन न केल्यामुळे संजय गायकवाड हे नाराज आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(नक्की वाचा- कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे)
राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क
गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चेला आणखी पुष्टी मिळाली आहे. जिल्हा संघटकपदासारखी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतरही गायकवाड यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद सुरू आहेत का, अशा चर्चांना उधाण आले आहे.