गुरु दळवी, सिंधुदुर्ग: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत राजकारणातून संन्यास घेणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे.
शिवसेना शिंदे गटाच नेते, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपली मुलगी सोनाली केसरकर आणि सुरज केसरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगत राजकीय निवृत्तीची घोषणा केली.
नक्की वाचा: 'मोदीजी घाबरु नका, तुमच्यात हिंमत असेल तर...', प्रियांका गांधींचे जाहीर सभेतून आव्हान
काय म्हणाले दीपक केसरकर?
'माझी सोनाली माझी राजकीय वारसदार नाही. मला कोणताही राजकीय वारसा नाही. माझी मुलगी गोर गरिबांच्या हितासाठी काम करत राहावे असे मला वाटते. मुलगा सुरजही तसाच आहे. राजकारणात आमदारकी हे एकच पद नसते. विधानपरिषद, जिल्हा परिषद असते. माझ्यासोबत जे युवक आलेले आहेत त्यांनी सर्वांनी वेगवेगळ्या पदांवर काम करावे. माझ्याकडे आलेल्या संजू परब यांना आम्ही विधानसभेची संधी देणार होतो. त्यावेळी ते आले असते तर आमचे उमेदवार असते. राजकीय वारसा घोषित करायला मला परंपरागत राजकारणात संधी मिळाली नाही.
ही खरोखर माझी शेवटची निवडणूक आहे. पुढच्या काळात माझा राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल. पण तो माझा नाही पक्षाचा वारसदार असेल. मी जे सांगतो ते स्पष्ट सांगतो. माझी मुलगीही राजकारणात येणार नाही, ती समाजकारण करेल. ती चांगली उद्योजिका बनेल.मी स्वतः अस्वस्थ झालो आहे, हे सर्व पाहून. येत्या सहा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा आणि युवा शक्ती सकारात्मकरित्या वापरली जाईल, असे दीपक केसरकर म्हणाले. ऐन विधानसभेचा प्रचार संपत आला असतानाच दीपक केसरकर यांनी ही मोठी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
महत्वाची बातमी: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला