मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार.. अशा चर्चांना उधाण आले असून दोन्ही ठाकरेंकडूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत.. अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. परंतु सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा अन् प्रतिसाद स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना साद- प्रतिसाद दिल्याने सुरु झालेत.
सध्या दोन्ही ठाकरे परदेशात असले तरी परदेशातून आल्यानंतर या चर्चा कोणत्या वळणावर जातात? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे, तत्पुर्वी ठाकरे गटाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर झालेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वेळ आलीयं, एकत्र येण्याचीमुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी.. अशा आशयाची पोस्ट करत ठाकरे गटाकडून अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंशी हातमिळवणी करण्याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, यावर आता परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच भाजप- मनसेत नाराजीनाट्य बसल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिपालिका भरवण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मनसेने भाजपसह ठाकरे गटालाही निमंत्रण दिले आहे. मात्र ठाकरे गटाला निमंत्रण दिल्यानंतर भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
ज्या उबाठा गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबावत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.