Bhimashankar Jyotirlinga Darshan: सोमवारपासून पवित्र श्रावण महिना (Shravan Month 2025) सुरू होत असल्याने, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा लक्षात घेऊन प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यात्रेच्या नियोजनासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. मंदिर समितीने अधिकृत संकेतस्थळ स्थापन करून भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
( नक्की वाचा: भगवान शंकराला 'ही' 5 फळे अर्पण करू नका, शिवपूजेत 'या' गोष्टी आवर्जून टाळा )
जिल्हाधिकारी कार्यालयात श्रावणी सोमवार यात्रा नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, प्रशासकीय व्यवस्थापक प्रमोद शिर्के, सह-कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, खेडचे तहसीलदार प्रशांत बेद्रे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दर्शनासाठी विशेष व्यवस्था आणि सुविधा
श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी डुडी यांनी दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. यात एक व्ही.आय.पी. दर्शन रांग आणि दुसरी साधी दर्शन रांग अशा दोन रांगांची व्यवस्था करावी. तसेच, दर्शन आणि पूजा करण्यासाठी निश्चित टप्पे तयार करावेत. पोलिस विभागाने वाहनतळाची ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. वन विभागानेही रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी पाहणी करावी, जेणेकरून भाविकांची गैरसोय टाळता येईल आणि त्यांना चांगल्या सुविधा देता येतील. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करून दक्ष राहावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
( नक्की वाचा: श्रावण महिना कधीपासून सुरु होणार? जाणून उपवास, पूजा आणि धार्मिक फायदे )
रविवारपर्यंत कामे संपवण्याचे निर्देश
या कामांना प्राधान्य देऊन येत्या रविवारपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याव्यतिरिक्त, मंदिर परिसर, भीमाशंकर गाव आणि मंचर या ठिकाणी क्यूआर कोड बाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून व्ही.आय.पी. दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, क्यूआर कोडद्वारे मंदिर संस्थानमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
( नक्की वाचा: श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब )