गुरूप्रसाद दळवी
एक तरूणी नव्या जिवनाची सुरूवात करणार होती. तिचं लग्न ठरलं होतं. त्या आनंदात ती होती. लग्न म्हणजे आयु्ष्यातला एक सुवर्ण क्षण. त्या क्षणाची ती आतूरतेना वाट पाहात होती. लग्नाच्या तयारीला ही ती लागली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. तिने कल्पनाही केली नसेल की आपल्यासोबत असं काही होईल. पण तसं भयंकर घडलं. लग्नाची पत्रिका द्यायला जात असताना या तरुणीचा भीषण अपघात झाला. त्यातच तिचा मृत्यू झाला. सर्व स्वप्न क्षणात हवेत विरले. सर्व काही संपलं. तिच्या कुटुंबावर तर दुख:चा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना ऐन दिवाळीत सिंधुदुर्गात घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
फोंडाघाट गांगोवाडी येथील दिलीप सावंत यांची मुलगी निकिता सावंत हीचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे ती आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावाकडे आली होती. रविवारी सकाळी सख्ख्या भावासोबत मामाकडे पत्रिका देण्यासाठी ती गेली होती. त्यानंतर ती घरी परतत होती. त्यावेळी एसटी बस आणि तिच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात निकिता हिचा मृत्यू झाला. निकिता हिचं लग्न 3 फेब्रुवारीला होणार होतं. लग्नाची सर्व तयारी झाली होती. पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. त्या ती स्वत: सर्वांना वाटत होती.
पण त्या आनंदाच्या क्षणांपूर्वीच काळाने तिच्यावर निर्दयी घाला घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईवरून आपल्या आजोळी लग्नाची पत्रिका कुलदेवतेला ठेवायला ती आली होती. त्यानंतर आपल्या मामाकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी आपल्या सख्ख्या भावासोबत दुचाकीने मामाच्या घरी जात होती. कसवन तळवडे येथून येत असताना आंबरडच्या दिशेने जाणारी एसटी बस अचानक समोर आली. त्यामुळे तिचा भाऊ वैभव दिलीप सावंत याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याची गाडी रस्त्यावर स्लिप झाली. गाडी अनियंत्रित झाली होती.
नक्की वाचा - Muslim women: मुस्लिम महिला करतायत श्रीरामाची आरती, त्या मागचे कारण ऐकून धक्का बसेल
या अपघातात दोघेही गाडीवरून खाली पडले. त्यांना जबर मार लागला होता. एसटीतील लोक खाली उतरले. त्यांनी त्या दोघांनाही त्याच एसटी बस मधून आम्रड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. त्यानंतर कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात तिला नेण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालयातही नेण्यात आले. पण तत्पूर्वी तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी दुचाकी चालक वैभव दिलीप सावंत याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.