गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीनंतर आता जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, प्रशासनाने सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश काढले आहेत.
सोमवारपासून नवीन वेळापत्रक लागू
वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना दुपारच्या उन्हात प्रवास करणे कठीण जात होते. यावर उपाय म्हणून सोमवार, 9 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा खालील वेळेनुसार भरतील. शाळेची वेळ सकाळी 7 ते 11.15 असणार आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
शिक्षक समितीचा पाठपुरावा
4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षणाधिकाऱ्यांना एक विशेष निवेदन दिले होते. उन्हामुळे विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा इतर त्रास होऊ शकतात, याकडे समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला.
पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा
दुपारच्या सत्रात शाळा सुटल्यानंतर घरी जाताना विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागत होता. आता 11.15 वाजता शाळा सुटणार असल्याने विद्यार्थी उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी घरी पोहोचू शकतील. या निर्णयाचे पालक आणि शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे. शाळा सकाळच्या सत्रात सुरू झाल्या असल्या तरी, प्रशासनाने शिक्षकांना विद्यार्थ्यांना पुरेशी पाणी पिण्याची सुट्टी देण्याचे आणि शाळा सुटताना कडक उन्हात खेळू न देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
(नक्की वाचा- Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)
जळगावातही शाळेच्या वेळेत बदल
जळगाव जिल्ह्यातही तापमान 37 अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतलाय. 9 मार्चपासून जळगाव जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीबीएससी वगळता सर्व इंग्रजी माध्यमांनाही हे आदेश लागू असणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत.