पुण्याच्या मौजे कुसगाव येथे 25 मार्च 2025 रोजी सुमारे 57000 किलो गोवंश मांस दोन मोठ्या कंटेनरमध्ये वाहतूक करताना आढळून आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत तपास करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.श्रीकांत भारतीय आणि ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर गृहराज्यमंत्री भोयर यांनी उत्तर दिले.
( नक्की वाचा: पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास )
हैदराबादच्या कंपनीचा परवाना रद्द होणार
राज्यमंत्री भोयर म्हणाले की, प्राथमिक तपासात एशियन फूड्स मायक्रो प्रा. लि. या कंपनीचा या वाहतुकीत सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही कंपनी हैदराबाद येथील असल्याने राज्य शासनाकडून या कंपनीचे अपेडाद्वारे प्राप्त परवाना रद्द करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात आली आहे असे भोयर यांनी सांगितले.
( नक्की वाचा: पिंपरी चिंचवड पालिकेचा दणका! 36 अभियंत्यांना नोटीस; कारण काय? )
एकाला अटक, जामीनही मिळाला
या प्रकरणी कंपनीचे दोन मालक आरोपी आहेत. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन जामीन मिळाला आहे. दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरू आहे. वारंवार अशा प्रकारच्या गोमांस तस्करी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्याचा विचार करण्यात येत आहे. तिसऱ्यांदा गुन्हा करताना आढळल्यास मकोका अनिवार्यपणे लावण्यात येईल. तसेच आगामी अधिवेशनात गोमांस तस्करी विरोधी स्वतंत्र कायदा आणण्याचाही निर्णय घेण्यात येईल. यासोबतच, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल झाले असतील, तर त्याचा आढावा घेऊन गुन्हे मागे घेण्याच्या दृष्टीनेही विचार केला जाईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.
सन 2022 ते 2025 दरम्यान गोवंशीय प्राण्यांची कत्तल, वाहतूक व विक्री संदर्भात 2849 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 4677 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 1724 टन मांस जप्त करण्यात आले असल्याची माहितीही राज्यमंत्री भोयर यांनी यावेळी दिली.