
शुभम बायस्कर, अमरावती: कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अमरावती ग्रामीण पोलीस दलातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षकांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, विविध कारणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अमरावती ग्रामिण पोलिस दलातील सहा पोलिस अंमलदारांना विविध कारणाने निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केली आहे. सहा अंमलदारांपैकी दोन पोलिस जमादार आहेत तर उर्वरित चार जण पोलिस शिपाई म्हणून विविध पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
निलंबित केलेल्यांपैकी दोघांना दारु पिवून कर्तव्यावर हजर असल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. तर अंजनगाव सुर्जी येथील पोलीस कर्मचारी महिला तक्रारदारासोबत असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. येवदा ठाण्यात कार्यरत पोलिस जमादार प्रशांत अहीर हे मुद्देमाल मोहरर होते. त्यांनी मुद्देमालाबाबत योग्य कारवाई न करता कामकाज प्रलंबित ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई केली आहे.
नक्की वाचा - IPL सट्ट्याची चटक, तरुण बनला चोर ! लग्नाचं कार्ड दाखवून वृद्ध महिलेला...
दरम्यान, या सर्व अंमलदारांच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमाणसात मलीन झाली, असा ठपका ठेवून प्रभारी पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यामुळे इतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईची सध्या पोलीस दलात चांगलीच चर्चा होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world