राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात दिसलेल्या वाघाला पकडण्याचे आदेश वन विभागाकडून देण्यात आले आहेत. सोलापूरच्या या वाघाला सह्याद्री अभयारण्यात हलवण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. नुकत्याच धाराशिव आणि सोलापूरमध्ये दिसून आलेल्या नर वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 11 अंतर्गत पुणे वन विभाग आणि औरंगाबादचे वन संरक्षक यांना आदेश देण्यात आले आहेत. जर गरज पडली तर या वाघाला रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवले जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्य वन संरक्षक यांनी याबाबत नागपूर येथील मुख्य कार्यालयाला प्रस्ताव पाठवला होता. या वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्याचा प्रस्ताव होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालाही या वाघाला पकडण्यासाठी त्वरित प्रतिसाद दल पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Bird Sanctuary : देशी-विदेशी जातीचे तब्बल 30 हजार पक्षी नांदुरमधमेश्वरमध्ये दाखल, पर्यटकांची मोठी गर्दी
काय आहे कारण?
हा वाघ सोलापूरमध्ये मानवी वस्तीच्याजवळ आल्याने संघर्षाची शक्यता होती. त्यामुळे या वाघाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा वाघ 2022 मध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात जन्माला आला होता. त्यानंतर तो 2023 मध्ये या अभयारण्यातून गायब झाला होता. नंतर तो धाराशिव येथील रामलिंग वन्यजीव अभयारण्यात दिसून आला होता. त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यात फिरत होता. हा वाघ सोलापूर जिल्ह्यात 50 वर्षांनंतर दिसून आला होता. नवीन प्रदेश शोधण्यासाठी किंवा जोडीदार शोधण्यासाठी फिरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा वाघ धाराशिव सोडून गेल्यानंतर 20 दिवसांनी बार्शीत दिसून आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world