सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने सिना नदीला पूर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि पक्षाचे प्रमुख नेते सोलापूरमध्ये विविध ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या 3000 लोकसंख्या असलेल्या गावात अन्नधान्य किट वाटप करत असताना, ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून अपुरी मदत मिळत असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला.
ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, "साहेब, या गावाची लोकसंख्या खूप जास्त आहे, पण प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहे. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शांतपणे उत्तर देताना उलट वाघमारे यांनाच जाब विचारला. जिल्हाधिकारी म्हणाले, "आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत. तुम्ही सध्या त्या गावात आहात, तर तुम्ही किती किट आणल्या आहेत?"
पाहा VIDEO
<
(नक्की वाचा- Maharashtra Rain: शेतकरी रडकुंडीला, नागरिक हैराण… महाराष्ट्रात एवढा पाऊस का पडतोय? वाचा कारण)
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रश्नावर ज्योती वाघमारे नीट उत्तर देता आलं नाही. 3,000 लोकसंख्या असलेल्या त्या गावात वाघमारे शिवसेनेच्या माध्यमातून फक्त 200 किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या.
'तुमचं राजकारण नंतर करा'
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर बोलताना ज्योती वाघमारे यांना खडेबोल सुनावले. त्यांनी वाघमारे यांना स्पष्टपणे सांगितले की, "आता राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा." अशारीतीने संवेदनशील परिस्थितीत मदतकार्यातही राजकारण आणल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना दिलेली ही समज सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.