NCP Leader Baba Jagtap : सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते बाबा जगताप पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केलाय.
अजित पवारांसोबत गाजलं नाव
बाबा जगताप यांचे नाव यापूर्वीही वादग्रस्त प्रकरणात चर्चेत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा जगताप हे केंद्रस्थानी होते. कुर्डू येथे बेकायदेशीर मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या आयपीएस अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्याचा आरोप झाला होता.
( नक्की वाचा : Ajit Pawar Video : अजित पवारांनी अखेर मौन सोडले; महिला अधिकाऱ्यासोबतच्या वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... )
त्यावेळी अजित पवार यांना फोन लावून देणारी व्यक्ती बाबा जगतापच होते, असे म्हटले जाते. या प्रकरणावरून अजित पवारांनी ट्विट करत आपली बाजू मांडली होती. आता अंमली पदार्थ सेवन करतानाचा हा नवीन व्हिडिओ समोर आल्याने बाबा जगताप यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या प्रकरणात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा असा व्हिडिओ समोर आल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत असून, बाबा जगताप यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहेत.