Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी

Solapur News : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. तेव्हापासून सोलापूर जिल्ह्यात 'मोहिते पाटील विरुद्ध भाजप' असा सामना रंगत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर 

लोकसभा निवडणुकीपासून सोलापूर जिल्ह्यात भाजपविरोधात एल्गार पुकारणारे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आता केंद्र सरकार आणि लोकसभेने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 'भारत आणि संयुक्त अरब (UAE) मैत्री समिती'वर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या भाजप सरकारशी जिल्ह्यात त्यांचा टोकाचा संघर्ष सुरू आहे, त्याच सरकारकडून त्यांना परराष्ट्र धोरणाशी संबंधित या समितीवर स्थान मिळाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

गल्लीत संघर्ष, दिल्लीत महत्त्वाची पदे

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. तेव्हापासून सोलापूर जिल्ह्यात 'मोहिते पाटील विरुद्ध भाजप' असा सामना रंगत आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे माढा आणि सोलापूर या दोन्ही जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला.  सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा या चार मतदारसंघांत भाजपला मोहिते पाटलांच्या विरोधामुळे मोठी किंमत मोजावी लागली. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

(नक्की वाचा-  Supreme Court on Voting: मतदान करणे सक्तीचे होणार? सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी)

नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

एकीकडे स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत भाजपला रोखण्यासाठी मोहिते पाटील रणनीती आखत असताना, दुसरीकडे दिल्लीत लोकसभा अध्यक्ष आणि केंद्र सरकारने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. भारत आणि UAE या दोन देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ही मैत्री समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नियुक्तीमुळे भाजप आणि मोहिते पाटील यांच्यातील दुरावा कमी होत आहे का? किंवा लोकसभेतील कामकाजाच्या निमित्ताने मोहिते पाटलांची ताकद ओळखून भाजपने ही खेळी केली आहे का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

सोलापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

धैर्यशील मोहिते पाटील यांची ही निवड केवळ संसदीय प्रक्रिया आहे की त्यामागे काही राजकीय संकेत आहेत, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या निवडीमुळे मोहिते पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दिल्लीत वाढलेल्या त्यांच्या वजनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article