- अनगर गावाने मुलांच्या आरोग्यासाठी संध्याकाळी दोन तास मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
- हा निर्णय प्राजक्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनी घेण्यात आहे
- डिजिटल उपवासामुळे मुलांचे आरोग्य सुधारेल, मानसिक एकाग्रता वाढेल आणि झोपेच्या नियमांमध्ये सुधारणा होईल
सौरभ वाघमारे
मोबाईल-टीव्हीला ‘पूर्णविराम', संवादाला ‘नवा आरंभ' असं अनगर नगरपंचायती होताना दिसत आहे. याबाबतचा ऐतिहासिक निर्णय ही घेण्यात आला आहे. मुलांच्या भविष्यासाठी दोन तास ‘डिजिटल उपवासाचा हा संकल्प म्हणावा लागेल. तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मोबाईलमध्ये हरवत चालला आहे. पण सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर गावाने संपूर्ण राज्यासमोर एक अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे. नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी अनगरकरांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी रोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा धाडसी व अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. केवळ ध्वजारोहणाच्या औपचारिकतेपुरता न राहता, सामाजिक परिवर्तनाचा खरा झेंडा अनगरच्या जागरूक ग्रामस्थांनी फडकवला आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपयोग करत, डिजिटल गुलामगिरीपासून मुक्ती मिळवण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडणे, मानसिक एकाग्रता कमी होणे, झोपेच्या नियमांना बाधा येणे यासारख्या गंभीर समस्यांना समोर येत आहेत. या दोन तासांच्या डिजिटल उपवासामुळे मुले मैदानी खेळ, वाचन किंवा रचनात्मक उपक्रमांकडे वळतील, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे. शारीरिक हालचाली वाढल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील बळकट होणार आहे.
टीव्हीच्या दैनंदिन मालिका आणि सोशल मीडियाच्या अंतहीन ‘रील्स'मध्ये कुटुंबातील संवाद पूर्णपणे हरवला होता. आता 7 ते 9 ची वेळ घरगुती गप्पांसाठी, वडीलधाऱ्यांचे जीवनानुभव ऐकण्यासाठी, मुलांशी खरा सुसंवाद साधण्यासाठी आणि कौटुंबिक बंध दृढ करण्यासाठी वापरली जाईल. जुन्या पिढीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही सुवर्णसंधी आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ भौतिक विकासच नाही, तर ‘बौद्धिक आणि सामाजिक' विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स' अत्यंत आवश्यक आहे. हे जगभरातील संशोधन सांगत आहे. अनगरच्या ग्रामस्थांनी एकमताने या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले असून, यामुळे गावात एक नवी सामाजिक शिस्त आणि सांस्कृतिक जागृती निर्माण होणार आहे. हा निर्णय केवळ अनगरसाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला प्रेरणा देणारा आहे. अनगरने दाखवून दिले की बदल शक्य आहे, फक्त संकल्पशक्ती हवी. आजच्या काळात जिथे सर्वत्र डिजिटलच्या आहारी गेलेले दिसतात, तिथे अनगरने विचार करण्याची वेगळीच दिशा दाखवली आहे.