Solapur News : सोलापुरातून एका शिक्षक मुलाला आपल्या आई-वडिलांना दहमहिन्याला १० हजार रुपये देण्याचे आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.
आई-वडील आपल्या मुलांना स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मोठं करतात. त्यांना शिकवतात. मात्र त्यांच्या वृद्धापकाळात मुलं त्यांचा सांभाळ करण्याऐवजी दुर्लक्ष करीत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येतात. सोलापुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातून अज्ञान गैबू वाघमारे आणि बायडाबाई अज्ञान वाघमारे यांच्या ८ डिसेंबर २०२५ च्या अर्जावर ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम २००७ मधील कलम ९ नुसार हा आदेश देण्यात आला आहे.
वृद्ध दाम्पत्याच्या तक्रारीनंतर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई...
शिक्षण मुलाच्या आई-वडिलांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मुलाबाबत तक्रार केली होती. वाघमारे दाम्पत्याने मोलमजुरी करून मुलगा दशरथ याला शिकवलं. तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून शिक्षक आई-वडिलांचा सांभाळ करीत नसल्याचं समोर आलं आहे. मात्र आता म्हातारपणात आम्ही कुठेच जाऊ शकत नाही. मुलाचे सासू-सासरे आणि सून भांडण करून आम्हाला मारहाण करतात, असंही त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे सांगितलं. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी पीडित आई-वडिलांचं म्हणणं ऐकून घेत त्यावर कारवाई केली. त्यानुसार, आई-वडील यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे महिन्याला १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.