संकेत कुलकर्णी, पंढरपूर
भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पु्न्हा एकदा मोहिती पाटलांवर हल्लाबोल केला आहे. सहकार लुटून खाल्ला अन् आता करमाळ्यात सहकार वाचवण्याचे तत्त्वज्ञान सांगतात. आपण भाजपचे रगेल कार्यकर्ते, कुणाच्या बापाला नाही घाबरत नाही, अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.
माळशिरसमध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी सातपुते यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह पर्यायाने मोहिते पाटलांवर तोफ डागताना, मुख्यमंत्री फडणवीस आपला एका रिंगेत फोन उचलतात, असे सांगत सज्जड दम देण्याचे काम केले.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले. मात्र माढा मतदारसंघाची अवस्था पावसात धुवून निघालेल्या हल्या सारखी झाली आहे. पण आम्ही रगेल कार्यकर्ते या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणू, असा निर्धार राम सातपुते यांनी केला.
सहकारी संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या
मोहिते पाटील सध्या करमाळा तालुक्यात लागलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करत आहेत. सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगत आहेत. पण , मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी , कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या. मात्र या शेतकऱ्याच्या संस्था होत्या. कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी शेअर घेतले. मात्र हे लुटून खायचे काम यांनी केले. त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या विरोधात माळशिरसमध्ये पाय रोऊन उभा आहे, असं म्हणत राम सातपुतेंना पुन्हा एकदा मोहिती पाटलांना डिवचलं आहे. यातून माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा संघर्ष कायम असल्याचे दिसून आले.
मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. हे केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच शक्य झाले आहे, असंही राम सातपुते यांनी म्हटलं.