सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गोवा आणि मुंबईनंतर आता सोलापूर थेट इंदूरशी हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून 'स्टार एअर' (Star Air) कंपनीने या सेवेचा विस्तार इंदूरपर्यंत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्टार एअर कंपनीच्या या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. विमान थेट इंदूरला न जाता मुंबईमार्गे जाणार आहे.
प्रवासाचे वेळापत्रक (सोलापूर ते इंदूर)
>> सोलापूर उड्डाण - दुपारी 2.50 वाजता सोलापूरहून विमानाचे उड्डाण होईल.
>> मुंबई आगमन - दुपारी 3.55 वाजता विमान मुंबईत पोहोचेल.
>> मुंबई थांब - मुंबई विमानतळावर साधारण 45 मिनिटांचा थांबा असेल.
>> मुंबई ते इंदूर उड्डाण - दुपारी 4.45 वाजता विमान मुंबईहून इंदूरसाठी रवाना होईल.
>> इंदूर आगमन - संध्याकाळी 5.50 वाजता विमान इंदूरला पोहोचेल.
(नक्की वाचा- VIDEO: अरबी समुद्रात ‘ उकळ्यांचे रिंगण'; विचित्र हालचालींमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण)
स्टार एअरची ही सेवा सोमवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस असेल.
विमानसेवेचा विस्तार का?
सोलापूर-मुंबई विमानसेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर आणि इंदूर या दोन्ही शहरांमध्ये व्यावसायिक संबंध मोठे आहेत. तसेच इंदूर हे स्वच्छ शहर आणि शैक्षणिक केंद्र असल्याने प्रवाशांची संख्या मोठी आहे. हीच गरज ओळखून स्टार एअरने हा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.