यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
SSC Maths Paper Leak: दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणितासारख्या महत्त्वाच्या विषयाचे दोन्ही पेपर चक्क परीक्षेच्या तीन दिवस आधीच सोशल मीडियावर उपलब्ध झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर पुन्हा द्यावा लागणार का, असा मोठा प्रश्न उभा राहिला असून पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत तातडीने पोलिसांत धाव घेतली आहे.
दहावीच्या गणिताचे पेपर फुटल्याचे उघड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या दहावीची परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेदरम्यान गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एका टेलिग्राम ग्रुपवर या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच प्रसारित झाल्या होत्या. पुणे विभागीय मंडळाला या संशयास्पद प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी केली. या तपासणीत ग्रुपवर आलेल्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांची कटकट संपणार, रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप, असा असेल तुमचा नवा हायवे, वाचा सविस्तर )
3 दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर उपलब्ध
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे प्रश्नपत्रिका परीक्षेच्या काही तास आधी नव्हे, तर तब्बल तीन दिवस आधीच बाहेर आल्या होत्या. पुणे विभागीय मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 मार्च रोजी झालेला गणित भाग 1 चा पेपर 5 मार्च रोजी रात्री 8 वाजून 37 मिनिटांनी ग्रुपवर टाकण्यात आला होता.
त्याहून धक्कादायक म्हणजे 9 मार्च रोजी झालेला गणित भाग 2 चा पेपर चक्क 6 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटांनीच ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.
( नक्की वाचा : Amravati News : अमरावती झेडपीत काय चाललंय? मर्जीतील मुख्याध्यपकांसाठी CEO मॅडमकडून नियमांना केराची टोपली! )
विज्ञानाचे पेपरही धोक्यात?
गणिताच्या पेपरसोबतच विज्ञानाचे पेपरही फुटले असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. संबंधित टेलिग्राम ग्रुपवर केवळ प्रश्नपत्रिका दिल्या जात नव्हत्या, तर त्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणीही केली जात होती. 9 मार्च रोजी सायंकाळी या ग्रुपवर विज्ञान 1 आणि विज्ञान 2 च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता.
या प्रश्नपत्रिका हव्या असल्यास एका विशिष्ट आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे पेपरफुटीचे हे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
शिक्षण मंडळाकडून पोलिसात तक्रार दाखल
पेपरफुटीचा हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरून टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन आणि त्यातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही प्रश्नपत्रिका कोणत्या स्तरावरून आणि कोणाच्या माध्यमातून बाहेर गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सायबर पोलीस देखील या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून लवकरच मुख्य सूत्रधार हाती लागण्याची शक्यता आहे.
पुन्हा परीक्षा होणार का?
गणिताचे दोन्ही पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यामुळे आता नियमानुसार ही परीक्षा पुन्हा घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर मोठ्या प्रमाणावर या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या असतील, तर पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षण मंडळाला फेरपरीक्षा घ्यावी लागेल. मात्र, अद्याप मंडळाने अधिकृतपणे फेरपरीक्षेबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. पोलिसांच्या तपास अहवालानंतर आणि सरकारच्या निर्णयानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.