जाहिरात

Amravati News : अमरावती झेडपीत काय चाललंय? मर्जीतील मुख्याध्यपकांसाठी CEO मॅडमकडून नियमांना केराची टोपली!

Amravati News : अमरावती जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सध्या संशयास्पद निर्णयांची मालिकाच सुरू आहे. सु

Amravati News : अमरावती झेडपीत काय चाललंय? मर्जीतील मुख्याध्यपकांसाठी CEO मॅडमकडून नियमांना केराची टोपली!
Amravati News : विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या मंजुरीचा शिक्का आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : अमरावती जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सध्या संशयास्पद निर्णयांची मालिकाच सुरू आहे. सुधीर खोडे कॉपीकांड प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता दर्यापूरच्या मुख्याध्यापिका शिला गोपाळराव आठवले यांच्या नियुक्तीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पदोन्नती चिखलदरा येथे मिळालेली असताना त्यांना नियमांना बगल देऊन अंजनगाव सुर्जी येथे पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या मंजुरीचा शिक्का असल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे प्रकरण?

शिला आठवले यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची पहिली पदस्थापना चिखलदरा पंचायत समितीमध्ये मंजूर करण्यात आली होती. नियमानुसार, समुपदेशनाने पदोन्नती जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी रुजू होणे बंधनकारक असते, अन्यथा ती पदोन्नती रद्द ठरते. 

मात्र, आठवले यांच्या बाबतीत 3 महिन्यांनंतर एक 'अंशतः बदल आदेश' काढण्यात आला. यामध्ये 'वैयक्तिक विनंती' आणि 'तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्ती' असे कारण दाखवून त्यांना थेट अंजनगाव सुर्जी येथे पाठवण्यात आले. शासनाच्या नियमानुसार असा कोणताही बदल केवळ प्रशासकीय गरजेपोटीच करता येतो, केवळ विनंतीवरून पदस्थापना बदलणे हे नियमांच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Badlapur News: होम लोन फेडलं तरी घर होणार सील? बदलापुरातील 'या' हायप्रोफाईल सोसायटीत खळबळ! )
 

काय दिले कारण?

चिखलदरा येथे जाणे टाळण्यासाठी आठवले यांनी वैद्यकीय कारणाचे पत्र दिले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुर्गम भागात काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, अंजनगाव सुर्जी येथे रुजू होताच त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचा डोंगर सोपवण्यात आला आहे.

सध्या त्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, परीक्षेची जबाबदारी आणि इ-वर्ग जमिनीचा लिलाव असे एकापेक्षा जास्त महत्त्वाचे अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका ठिकाणी काम करणे कठीण होते, तीच व्यक्ती इतक्या जबाबदाऱ्या कशा काय सांभाळू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

( नक्की वाचा : Amravati News : काय सांगता! मुख्याध्यापकाने चक्क साहेबांचीच सही ठोकली; अमरावतीतील 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं? )

सीईओ संजिता महापात्र यांच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह

हा संपूर्ण आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्या स्वाक्षरीने निघाला असला तरी, त्यावर 'मूळ टिपणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मंजूर' असा स्पष्ट उल्लेख आहे. सुधीर खोडे यांना नियमबाह्य प्रभार देण्याचे आदेशही सीईओ संजिता महापात्र यांनीच काढले होते आणि आता आठवले यांच्या बाबतीतही तेच घडल्याचे दिसत आहे. अंजनगाव सुर्जीशी संबंधित प्रत्येक संशयास्पद आदेशाचे धागेदोरे थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

खोडे प्रकरणामुळे संपूर्ण साखळीच रडारवर

27 फेब्रुवारी 2026 रोजी सुधीर खोडे यांना कॉपी करताना पकडल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या अटकेमुळे जिल्हा परिषदेतील अनेक गुपिते बाहेर येऊ लागली आहेत. खोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जीवनावर लिहिलेले नाटक, त्याला लोकप्रतिनिधींची असलेली उपस्थिती आणि त्यानंतर शिक्षण विभागातील हे संशयास्पद बदली आदेश, ही सर्व एक मोठी साखळी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी अमरावतीमधून जोर धरत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com