NCMC Card: 1 ऑगस्टची मुदत हुकली तरी काळजी नको! एसटीच्या 'या' निर्णयामुळे लाखो प्रवाशांची अडचण दूर

ST Bus NCMC Smart Card : राज्य सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins
NCMC Card: ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई:

ST Bus NCMC Smart Card : एसटी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 1 ऑगस्टपासून हे कार्ड अनिवार्य केले जाणार होते. मात्र, लाखो ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे निर्णय?

राज्य सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते. या सवलतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार होते. परंतु, राज्यातील हजारो पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अजून प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ तांत्रिक कारणामुळे प्रवासी सवलतीपासून वंचित राहू नयेत, म्हणून प्रशासनाने ही मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती )
 

या निर्णयामुळे आता 1 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना जुन्याच पद्धतीने किंवा आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच्याकडे अजूनही कार्ड आलेले नाही, अशा अमृत ज्येष्ठ नागरिक, इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही सर्वसामान्य प्रवाशाची अडचण होऊ नये हीच सरकारची भूमिका आहे. तसेच, ज्यांनी अजूनही NCMC स्मार्ट कार्ड काढलेले नाही, त्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन लवकरात लवकर कार्ड मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.