अमजद खान, कल्याण
टिटवाळा येथील महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन तिचे लचके तोडल्याची घटना ताजी असताना कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलाचे गुप्तांग आणि ओठाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्थव श्रीवास असं या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नक्की वाचा - क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना
शहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात राहणारा अर्थव हा मोहिंदर सिंग काबूल सिंग इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकतो. तो काल ट्यूशनला गेला होता. ट्यूशनवरुन सायंकाळी सहा वाजता घरी परतत होता. तोच अचानक त्याच्या मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या गुप्तांगाला आणि ओठाला चावा घेतला. या घटनेमुळे मुलगा भयभीत होऊन भेदरलेल्या अवस्थेत घरी आला. त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्याच्या आईने तत्काळ त्याच्या वडिलांना घडल्या घटनेची माहिती दिली. वडिलांनी घरी येऊन मुलाला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याला कळवा येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. कळव्यातून त्याला मुंबईतील शीव रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले आहे.
नक्की वाचा - खाज येते म्हणून ऑपरेशन, मृत्यूनंतरही 11 दिवस व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
मुलाचे वडील पप्पू श्रीवास यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. आज माझ्या मुलासोबत जो प्रकार घडला, तो अन्य मुलांसोबतही घडू शकतो. महापालिकेने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असं त्यांनी आपल्या मागणीत म्हटलं आहे. माजी नगरसेवक मोहन उगले यांनी सांगितलं की, महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. भटक्या कुत्र्यांकडे माणसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.