नागिंद मोरे
शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेने एका विद्यार्थ्याला एक भयंकर शिक्षा सुनावली. धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. फी दिली नाही म्हणून विद्यार्थ्याला डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याकडे केली. त्यांनी लागलीच चावरा इंग्लिश शाळेत धाव घेत मुलांना का डांबून ठेवण्यात आल्याचा जाब विचारला. मात्र त्यावेळी प्रिन्सिपल असलेले फादर उपस्थित नव्हते. त्यामुळे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ॲड. प्रविणकुमार परदेशी यांची दोन मुलं चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. एक 7 वी इयत्तेत आहेत. तर दुसरा चौथीमध्ये आहे. त्यांच्यासह काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाची फी भरली नव्हती. म्हणून शाळा व्यवस्थापनाने थेट त्यांना वाचनालयाच्या अंधाऱ्या खोलीत वेगळे बसवले असा आरोप पालकांनी केला आहे. शिवाय क्रूर पद्धतीची वागणूक दिल्याचं ही म्हटलं आहे. शाळा 16 जूनला सुरू झाली. 17 तारखेपासून सातत्याने या विद्यार्थ्यांना इतर मुलांमधून वेगळे काढून अमानुष वागणूक दिली जात आहे असा आरोप पालक असलेल्या अॅड. प्रविणकुमार परदेशी यांनी केला आहे.
धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देत लायब्ररीच्या खोलीत डांबून ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालकांच्या दक्षतेमुळे समोर आला. त्यानंतर भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्वरीत शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार देखील केली आहे. तसेच त्यांच्या निर्देशाने शिक्षणाधिकाऱ्यांनी चावरा स्कूलच्या प्रिन्सीपल आणि व्यवस्थापकांवर कारवाईचा करण्याचे आश्वासन दिले आहेत. याप्रसंगी चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापक असलेले फादर अलेक्स यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांनी सांगितले की आमच्या शाळेत सर्वच सुख सुविधा उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारचा त्रास आम्ही विद्यार्थ्यांना देत नाही. तुमच्या सूचनेप्रमाणे अजून काही यामध्ये वाढ करायची असेल तर ती आम्ही ती नक्कीच करू. मात्र काही लोकांचा आमचा शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी कोणाला शत्रू मानत नाही. मी सर्वांना मित्रच मानतो. हे सर्व मुलं माझीच मुलं आहेत. याच हेतूने मी ही संस्था चालवत आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिला आहे. दरम्यान सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी आता करण्यात आली आहे.