
Delhi Double Murder: ज्या घरात अनेक वर्षांपासून एक व्यक्ती विश्वासाने काम करत होता, तो केवळ एका रागाच्या भरात इतका क्रूर होऊ शकतो का? हा प्रश्न एका धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील लाजपत नगर येथे बुधवारी (2 जुलै) संध्याकाळी एका महिला आणि तिच्या मुलाची त्यांच्याच घरात घरगुती काम करणाऱ्या नोकराने कथितरित्या हत्या केली. मालकीण रुचिका सेवानी यांनी फटकारल्याने संतापलेल्या नोकराने त्यांचे गळे चिरून त्यांची हत्या केली आणि तो घरातून पळून गेला.
(नक्की वाचा: Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास रुचिकाचे पती कुलदीप सेवानी कामावरून घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी पत्नी आणि 14 वर्षांचा मुलगा क्रिशला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुलदीप यांना घराच्या गेटजवळ आणि जिन्यावर रक्ताचे डागही दिसले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात (PCR) फोन करून पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
कुलदीप यांच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. रुचिका (वय 42) पलंगाशेजारी जमिनीवर पडलेल्या होत्या. त्यांचा शर्ट रक्ताने माखलेला होता आणि त्यांच्या डोक्याभोवती रक्त साचले होते.
दहावीत शिकणारा क्रिश बाथरूमच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता.
रुचिका सेवानी पतीसोबत लाजपत नगर मार्केटमध्ये कपड्याचे दुकान चालवत असत.
( नक्की वाचा: Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
आरोपीला अटक
या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी मुकेश नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे, जो सेवानी कुटुंबाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि दुकानातही मदत करत असे. शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या मुकेशने रुचिका सेवानी यांनी फटकारल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
24 वर्षांचा मुकेश हा बिहारचा रहिवासी असून तो दिल्लीतील अमर कॉलनीमध्ये आपल्या मालकांच्या घराशेजारीच राहायचा.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, न्यायवैद्यक पथके पुरावे गोळा करण्यात मदत करत आहेत. घटनेचा क्रम शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world