प्रसाद शिंदे, अहिल्यानगर
पुणे पोलिसांनी शिरूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर गुजर यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस प्रशासन आणि राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.
ड्रग्ज प्रकरणात 'मोठ्या माशां'चा समावेश?
सुजय विखे यांनी या प्रकरणात थेट निलेश लंके यांच्याकडे बोट दाखवत अनेक प्रश्न उपस्थित केले. शामसुंदर गुजर हा पूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तिथे गुटखा आणि अवैध धंद्यांच्या तक्रारी असतानाही त्याची एलसीबीमध्ये बदली कोणाच्या सांगण्यावरून झाली? असा सवाल विखेंनी पोलीस अधीक्षकांना केला.
(नक्की वाचा- Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)
ड्रग्ज गायब झाल्यानंतर ते पारनेर तालुक्यात कोणाच्या घरी ठेवले होते? यामागे अनेक मोठे राजकीय मासे असल्याचे विखे म्हणाले. पोलीस प्रशासनाने 8 दिवसांत या प्रकरणातील सर्व सत्य समोर आणावे, अन्यथा स्वतः पत्रकार परिषद घेऊन नावे जाहीर करू, असा इशारा सुजय विखेंनी दिला आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
महापौर आरक्षण आणि जातीचे राजकारण
अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. "मूळ ओबीसींनाच हे पद मिळावे" या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर विखे म्हणाले की, लोक आता जातीभेदाच्या राजकारणाला कंटाळले असून त्यांना फक्त विकास हवा आहे. भाजपने केवळ शहराचे नाव अहिल्यानगर बदलून आनंद साजरा केला नाही, तर एका धनगर समाजाच्या महिलेला गटनेतेपद देऊन आपली सर्वसमावेशक भूमिका कृतीतून दाखवून दिली आहे, असंही सुजय विखे म्हणाले.