Sunetra Pawar, Deputy CM Maharashtra: राज्याच्या राजकारणात सध्या एका नव्या पर्वाची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली आहे. अनेकांसाठी त्या केवळ अजितदादांच्या पत्नी असतील, पण बारामतीकरांसाठी त्या गेल्या 41 वर्षांपासून विकासाच्या वाटेवर सोबत चालणाऱ्या खंबीर नेतृत्व आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तेर या ऐतिहासिक भूमीतून आलेल्या सुनेत्रावहिनींनी बारामतीच्या मातीत स्वतःला असं काही रुजवलं की, आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावाइतकीच त्यांचीही कर्तबगारी या परिसराच्या कणाकणात दिसून येते.
माहेरचं बाळकडू आणि सासरची प्रयोगशाळा
सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिवमधील तेर गाव. वडील स्वातंत्र्यसैनिक आणि भाऊ पद्मसिंह पाटील अनुभवी राजकारणी. यामुळे समाजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या सुनेत्रावहिनी लग्न होऊन काटेवाडीत आल्या आणि त्यांनी थेट शेतात पाऊल टाकलं.
'तात्यासाहेबांची सून' म्हणून घरात न बसता त्यांनी स्वतः शेतात राबून आधुनिक शेतीचा मंत्र दिला. त्यांनी 10 हजार पक्षांची पोल्ट्री 1 लाख पक्षांपर्यंत नेली आणि दूध संकलनातही क्रांती घडवून आणली. एखादी गोष्ट हाती घेतली की ती तडीस न्यायची, हा त्यांचा स्वभाव बारामतीच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरला.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )
काटेवाडीचा कायापालट आणि राज्याला मिळालेली दिशा
आज जे आपण 'निर्मल ग्राम' किंवा 'स्वच्छता अभियान' पाहतो, त्याची बीजे सुनेत्रावहिनींनी 2002 मध्येच काटेवाडीत रोवली होती. एकेकाळी घाणीचं साम्राज्य असलेल्या काटेवाडीला त्यांनी देशातील पहिलं 'सायबर ग्राम' आणि 'पर्यावरण ग्राम' बनवलं. त्यांनी सुरू केलेले 'शाळा प्रवेश उत्सव' आणि 'गुड मॉर्निंग पथक' यांसारखे उपक्रम पुढे महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे स्वीकारले. शून्य शिलकीवर बँक खाती उघडण्याची संकल्पना त्यांनी जनधन योजनेच्या सात वर्षे आधीच काटेवाडीत राबवली होती. घराच्या दारावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावून त्यांनी महिलांना घराचं खरं मालक बनवलं.
बारामती टेक्सटाईल पार्क ते जागतिक व्यासपीठ
बारामतीचा विकास म्हणजे केवळ रस्ते किंवा इमारती नाहीत, तर हाताला काम देणारी यंत्रणा आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून तब्बल 6000 महिलांना रोजगार मिळवून दिला. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी लाखो झाडं लावली आणि जलसंधारणाची कामं केली.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि शरद पवार-सुप्रिया सुळे गायब; बारामतीत नेमकं काय शिजतंय? )
त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली. फ्रान्स आणि सिंगापूर येथील जागतिक उद्योजकता शिबिरात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. मेक्सिकोतील महिला खासदार परिषदेत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मांडलेली ठाम भूमिका भारताच्या स्वाभिमानाची साक्ष देणारी ठरली.
नव्या जबाबदारीतून राज्याला मोठ्या अपेक्षा
राज्यसभेतील आपल्या अल्पशा कारकिर्दीतही त्यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असोत किंवा मुळा-मुठा नदीचं प्रदूषण, प्रत्येक विषयावर पोटतिडकीने आवाज उठवला. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच त्यांची निवड राज्यसभेच्या तालिका सभापतीपदी झाली. आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार गहिवरल्या, उपमुख्यमंत्री झाल्यावर दिली भावुक प्रतिक्रिया )
ज्या पद्धतीने त्यांनी काटेवाडी आणि बारामतीचा चेहरा बदलला, तसाच सकारात्मक बदल त्या संपूर्ण महाराष्ट्रात घडवून आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एक संवेदनशील महिला, अभ्यासू खासदार आणि आता राज्याच्या उपमुख्यमंत्री अशा विविध भूमिकांतून सुनेत्रा पवार यांचा प्रवास महाराष्ट्राला प्रगतीची नवी दिशा देणारा ठरेल, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे.