Sunetra Pawar: सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री! छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, शपथविधीही ठरला?

Sunetra Pawar to be Next Deputy CM of Maharashtra?: ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे मोठे संकेत दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत भुजबळांनी दिले आहेत.
मुंबई:

Sunetra Pawar to be Next Deputy CM of Maharashtra?: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेली उपमुख्यमंत्री पदाची आणि इतर महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खल सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचे मोठे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची जागा सध्या रिक्त असून ती सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून तातडीने कशी भरता येईल, याकडे आमचे लक्ष असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले भुजबळ?

अजित पवार यांच्या जाण्याने पक्षाचे आणि सरकारचे काम थांबून चालणार नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने ही दुर्घटना घडली ते पाहून आमची झोप उडाली आहे. मात्र 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे कोणाकडे तरी ही जबाबदारी देऊन पक्ष आणि सरकार चालवणे आवश्यक आहे. 

उद्या (शनिवार, 31 जानेवारी 2026) विधीमंडळाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये विधीमंडळाचा प्रमुख ठरवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे असे अनेकांचे मत असून, ते मत चुकीचे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )

उद्याच होऊ शकतो शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक शनिवारी, 31 जानेवारी रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेत्याची (सीएलपी) निवड केली जाईल. छगन भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, जर या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले, तर शनिवारीच त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकला जाऊ शकतो. राजकीय वर्तुळात या शक्यतेमुळे आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, 29 जानेवारी रोजी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यापूर्वी या नेत्यांनी बारामतीमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय स्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. प्रशासकीय कामात खंड पडू नये यासाठी महत्त्वाची खाती आणि जबाबदाऱ्यांचे वाटप लवकर होणे गरजेचे आहे.

पक्षांतर्गत नवीन रचनेची चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ उपमुख्यमंत्री पदासाठीच नाही, तर संघटनात्मक पातळीवरही मोठ्या बदलांची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करावे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, असा एक सूर पक्षात उमटत आहे. या निर्णयामुळे पक्षाला स्थिरता मिळेल आणि आगामी काळातील आव्हाने पेलणे सोपे जाईल, असा कयास लावला जात आहे.

Advertisement

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यात असतानाच, प्रशासकीय आणि राजकीय गरजा लक्षात घेऊन ही पावले उचलली जात आहेत. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीकडे लागले आहे. जर ठरल्याप्रमाणे प्रक्रिया पार पडली, तर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसतील.

Topics mentioned in this article