Sunetra Pawar Deputy Chief Minister : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या अकाली झालेल्या निधनानंतर कोण उपमुख्यमंत्री होणार याबाबत बऱ्याच चर्चा सुरू होत्या. दरम्यान याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्याची बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील.
काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक झाली. या बैठकीसाठी सुनेत्रा पवार या ऑनलाईन हजर होत्या. या बैठकीत प्रफुल्ल पटेल ही उपस्थित होते. उद्याच्या शपथविधी बाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदार आणि खासदारांना निमंत्रण पाठविण्यात आलं असून उद्या २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. याशिवाय आज रात्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
उद्या दुपारी २ वाजता बैठक...
उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. त्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल. मग त्यानंतर ते शपथविधीचा निर्णय घेतली असे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा मान
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्या राजकारणासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे माहेर देखील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत. महाराष्ट्राने आजवर अनेक दिग्गज नेते पाहिले आहेत, परंतु राज्याच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदावर आजपर्यंत एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यास त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंदवल्या जातील. ही घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकीय इतिहासातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकते.