ब्राऊन फिल्ड एअरपोर्ट म्हणजे काय? नागपूरला त्याचा काय फायदा होणार ?

नागपूरला रस्ते व रेल्वे वाहतुकीने जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला मिहान म्हणतात.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

सर्वोच्च न्यायालयाने नागपूरमध्ये ब्राऊन फिल्ड विमानतळाला मंजुरी दिली आहे. यामुळे नागपुरात जागतिक दर्जाचे विमानतळ उभे राहण्याचा मार्ग खुला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपुरात ब्राऊनफिल्ड एअरपोर्टला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी X वर एक पोस्ट करत म्हटले की, "सर्वोच्च न्यायासयाने जागतिक दर्जाचे ब्राऊनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी परवानगी दिल्याचे कळाल्याने मनस्वी आनंद झाला. या विमानतळाचे मी स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी मी बरेच प्रयत्नही केले होते. 'मिहान'ला यामुळे अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. "

मिहान म्हणजे काय ?

सर्वोच्च न्यायालयामध्ये या विमानतळाच्या मंजुरीसंदर्भातील काही याचिकांवर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. या याचिका फेटाळून लावत नागपुरातील ब्राऊनफिल्ड विमानतळाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला होता. हे विमानतळ मुख्यत्वे मिहान प्रकल्पाला अधिक बळकटी देणारे ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरचे भौगोलिक महत्त्व आहे. ते लक्षात घेता नागपूरला रस्ते व रेल्वे वाहतुकीने जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला मिहान म्हणतात. या प्रकल्‍पांतर्गत नागपूर येथे अस्तित्वात असलेल्‍या विमानतळाचा, आंतरराष्‍ट्रीय बहुविध प्रवासी व मालवाहतूक हब विमानतळ म्हणून विकास करण्‍यासोबतच विमानतळालगतचा परिसर विशेष आर्थिक क्षेत्रामध्‍ये (स्‍पेशल इकॉनॉमिक झोन-एसइझेड) परावर्तित करण्याचा सरकारचा मानस आहे.    

Advertisement

ब्राऊन फिल्ड एअरपोर्ट म्हणजे काय?

विमानतळांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे ग्रीन फिल्ड आणि दुसरा ब्राऊन फिल्ड. नव्याने उभ्या करण्यात आलेल्या विमानतळाला ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणतात, उदा. नवी मुंबईत उभा राहणारे विमानतळ. अस्तित्वात असलेल्या विमानतळाचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवणे याला ब्राऊनफिल्ड विमानतळ म्हणतात.  

Advertisement

नागपूरचे नाव जागतिक नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी या ब्राऊनफिल्ड विमानतळाचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या विमानतळामुळे हवाई प्रवास सुलभ होईल आणि प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीलाही अधिक बळकटी मिळेल असे बोलले जात आहे. यामुळे या ब्राऊनफिल्ड विमानतळामुळे गुंतवणुकीसही बळकटी मिळू शकेल.

Advertisement

नागपूरमध्ये जागतिक दर्जाचा विमानतळ विकसित करणे केवळ एक व्यावसायिक प्रयत्न नाही तर एक वैयक्तिक ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आर्थिक विकासाला हातभार लागेल. कायदेशीर प्रक्रियेतून पार पडत या ब्राऊन फिल्ड विमानतळाचा मार्ग मोकळा व्हावा देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर कोर्टाचा आदेश येईपर्यंत त्यांनी या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवले होते. कोर्टाला आपले मुद्दे पटवून देत या ब्राऊन फिल्ड एअरपोर्टचा मार्ग मोकळा व्हावा यासाठीच्या कायदेशीर लढाईसाठीचाही त्यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर याचे श्रेय हे फडणवीस यांनाच जात असल्याची प्रतिक्रिया नागपूरकरांकडून व्यक्त केली जात आहे.  

Topics mentioned in this article