- साजन धाबे, प्रतिनिधी
आगामी विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपने आज ५ जणांच्या उमेदवारीची घोषणा केली. ज्यात माजी मंत्री आणि लोकसभा निवडणूकीत बीडमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. पंकजा यांच्यासोबतच भाजपने OBC मतदारांना जपण्याकरता परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरीक्त शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनाही भाजपने विधानपरिषदेची जागा दिली आहे.
पाचव्या जागेवर मित्रपक्षातून रासपच्या महादेव जानकर यांचं नाव काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. जानकर यांना लोकसभेत महायुतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागाही देऊ केली होती. परंतु तिकडे त्यांना अपयश आलं होतं. अशातच जानकर यांच्या नावाची चर्चा असताना सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. परंतु सदाभाऊंना मिळालेल्या या संधीवर त्यांचे कधीकाळचे मित्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी यांनी जहरी टीका केली आहे.
हे ही वाचा - पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर
आम्हाला कोणाचेही पाय चाटून उमेदवारी नको - शेट्टी
वाशिम येथे पत्रकारांशी बोलत असताना राजू शेट्टी यांनी आम्हाला कोणाचेही पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही असं विधान करत सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?
कोणाला उमेदवारी मिळते कुणाला नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत आणि आम्हाला कुणाचे पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही. आम्ही लढून जे काय असेल ते राजकारण करायचं ठरवलं आहे. म्हणूनच कुठल्याही आघाडीमध्ये न जाता मी निवडणूक लढवली आहे.
आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींची जोरदार तयारी -
विधानसभेत जवळपास 30 ते 35 जागा लढवण्यासंदर्भात बारामतीच्या कार्यकारणी मध्ये चर्चा झालेली आहे. आणि लवकरच त्याची अंतिम यादी आम्ही जाहीर करू, असं शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केलं.
कसा असेल विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम?
25 जून - अधिसूचना जारी
2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै - अर्ज छानणी
5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता