योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली. अकोल्यातील शुअर विन (Sure Win Classes) क्लासेसचे १२ विद्यार्थी आणि ३ शिक्षक अशा १५ जणांचा गट शैक्षणिक सहलीसाठी काशीद बीचवर गेला होता. समुद्रात पोहत असताना अचानक आलेल्या लाटेमुळे दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्यात बुडाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले, मात्र त्यात एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राम कुटे आणि आयुष रामटेके यांचा मृत्यू
या घटनेत शिक्षक राम कुटे (वय ६०, रा. सुधीर कॉलनी, जवाहरनगर, अकोला) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय १९, अकोला) यांचा मृत्यू झाला आहे. तिसरा विद्यार्थी आयुष बोबडे (वय १७) हा सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी सांगितले. मृत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, राम कुटे यांचा मृतदेह बोर्ली येथे तर आयुष रामटेकेचा मृतदेह मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून सविस्तर तपास सुरू आहे.
नक्की वाचा - Akola News : अकोल्यात 'खाकी' ला डाग, थेट SP ऑफिसमध्येच लाच घेताना 'मॅडम' ना अटक
अकोल्यात शोककळा; राम कुटे लोकप्रिय शिक्षक
राम कुटे हे अकोल्यातील नामांकित शुअर विन क्लासेसचे संचालक होते. त्यांनी बारा ज्योर्तिलिंग परिसरात क्लास सुरू केल्यानंतर तोष्णीवाल लेआऊट भागात नवी शाखा उघडली होती. बुलढाण्यातही त्यांच्या क्लासेसची नवी शाखा सुरू करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. त्यांच्या निधनाने अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्रशासनाने या घटनेबाबत चौकशी सुरू केली असून, काशीद बीचवरील सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.