Maharashtra ST Bus Latest News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) वाढत्या डिझेल दरांचा आर्थिक भार लक्षात घेऊन साध्या बससेवा प्रकारासाठी लागू असलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने यापूर्वी उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन साध्या बसगाड्यांच्या भाड्यात तात्पुरती 10 टक्के वाढ लागू केली होती.या भाडेवाढीची मुदत 15 जुलै 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत होती. दरम्यान,वाढती प्रवासी संख्या,सध्याची वाहतूक गरज आणि वाढलेला इंधन खर्च विचारात घेऊन या भाडेवाढीस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला नाहीय. एसटीची तिकीट दरवाढ सुरूच राहणार असून प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
महामंडळाच्या दैनंदिन इंधन खर्चात मोठी वाढ झाली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार,एसटी महामंडळ ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह प्रवासी सेवा उपलब्ध करून देत आहे. मात्र,गेल्या काही कालावधीत डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळाच्या दैनंदिन इंधन खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर होत आहे.अशा परिस्थितीत प्रवाशांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी परिवर्तनशील भाडेवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Trending News: जमिनीत सापडले 15 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे अवशेष, जिराफसारखी मान पाहून शास्त्रज्ञही थक्क
त्यानुसार,31 जुलै 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत साध्या बससेवा प्रकारासाठी 10 टक्के परिवर्तनशील भाडेवाढ लागू राहणार आहे. एसटी महामंडळाचे उद्दिष्ट प्रवाशांना सुरक्षित,नियमित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हेच असून वाढत्या इंधन खर्चाचा ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रवाशांनी या निर्णयास सहकार्य करावे,असे आवाहनही महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.