
अमोल गावंडे, पाटील बुलढाणा: भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळून भयंकर अपघात झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे. चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत येथे हा अपघात झाला. यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्पोर्ट्स बाईक सुसाट वेगाने पळवण्याच्या नादात ता तिघांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या पल्सर गाडीचा अपघात झाला असून पल्सर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. या घटनेत गाडीवरील तिघेही युवक जागीच ठार झाले असून तिघेही सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी आहेत.
रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार, सोनू उसरे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तीनही तरुण एकाच गाडीवरुन प्रवास करत होते. सुसाट वेगात दुचाकी पळवण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले ज्यानंतर गाडी थेट झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की तिनही मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- CM Fadnavis : "विरोधी पक्षाला प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे", CM फडणवीस विरोधकांवर बरसले)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तिघांपैकी एकाही तरुणाने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला. दरम्यान, या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून तरण्याबांड तीन तरुणांचा असा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world