Thane News : 6 डिसेंबरला सुट्टी घेतली अन् 4 दिवस गायब; घरकामगार महिलेवर मालकीणीचा संताप, ठाण्यात 'गोळीबार'

घरकामगार महिला आणि घर मालकीण यांच्यातील 'तू तू मैं मैं' काही नवीन नाही. मात्र या 'तू तू मैं मैं' ने भयंकर रुप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane News : घरकामगार महिला आणि घर मालकीण यांच्यातील 'तू तू मैं मैं' काही नवीन नाही. मात्र या 'तू तू मैं मैं' ने भयंकर रुप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातून हे प्रकरण समोर आलं आहे. 

एक दिवसाची सुट्टी सांगून चार दिवसांची दांडी

एक दिवसांची सुट्टी घेऊन चार दिवस घरकाम करण्यासाठी न आल्याने ठाण्यातील घर मालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबासोबत वाद झाला. या वादात घर मालकीनीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीये. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ती बंदूक खरी नसून बंदुकीसारखी हुबेहूब दिसणारं लायटर असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर पुढील तपास सुरू आहे. 

महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ...

मिळालेल्या माहितीनुसार घोडबंदर रोड येथील वाघबीळमधील जानगिड गॅलॅक्सी टॉवरमध्ये राहणाऱ्या घर मालकीण मोनिका शर्मा यांच्या घरी घरकाम करणारी महिला गेल्या ६ महिन्यांपासून काम करते. या घरकाम करणाऱ्या महिलेने ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ दिवसांची सुट्टी घेतली होती.  मात्र प्रत्यक्षात चार दिवस उलटूनही ती कामावर आली नाही. वारंवार फोन करुन देखील फोन उचलत नसल्याने मोनिका शर्मा यांनी आज पुन्हा घरकाम करणाऱ्या महिलेला फोन केला. यावेळी घरकाम करणाऱ्या महिलेने फोन उचलताच संतापलेल्या मोनिका शर्मा आणि त्यांच्या मुलाने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच मुलाने देखील तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिथे असाल तिथून उचलून आणू अशी धमकी दिली. 

Advertisement

नक्की वाचा - Akola News : रात्री घराबाहेर पडले अन्...; 3 अल्पवयीन मुलं रहस्यमयरित्या गायब, पोलिसांची शोधमोहीम तीव्र

त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडित महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. यावेळी पीडित महिलेचे नातेवाईक घडलेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी घर मालकीनीच्या घराखाली गेले. यावेळी घर मालकीण तिच्या मुलगा आणि पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांमध्ये झालेल्या वादात घर मालकीनीच्या मुलाने धाक दाखवण्यासाठी बंदूक रोखली. या प्रकाराने घाबरलेल्या कुटुंबीयाने याबाबतची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. 

पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता ही बंदूक खरी नसून बंदुकीसारखा हुबेहूब दिसणारा लायटर असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलिसांनी घर मालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेने देखील पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तर पीडित महिलेने देखील घडलेला सर्व प्रकार सांगत घर मालकीनेने कॉलवर दिलेल्या धमक्यांच कॉल रेकॉर्डिंग  पोलिसांकडे सादर करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Advertisement
Topics mentioned in this article