ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 7 डिसेंबर 2025 रोजी घोडबंदर रोडवरील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गायमुख, काजूपाडा आणि फाऊंटन हॉटेल या दरम्यानच्या रस्त्याचा समावेश आहे.
नक्की वाचा: प्रवाशांचे हाल, इंडिगोचं 'वर्क रोस्टर' कुठे बिघडलं? विमानतळावर मोठी गर्दी
7 डिसेंबरपासून वाहतुकीत बदल
ठाणे वाहतूक पोलिसांनी X वर पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील घोडबंदर मार्गावर ग्राऊटिंग आणि मास्टीक अस्फाल्टचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाहतूक बंदी 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. पुढचे 24 तासांसाठी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
अवजड वाहनांना घोडबंदरवर नो एन्ट्री
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जड वाहने आणि हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. मुंबई आणि ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन इथे नो एन्ट्री असेल . या वाहनांसाठी पहिला पर्यायी मार्ग म्हणजे त्यांनी वाय जंक्शनवरून खारेगाव टोल नाका, माणकोली आणि अंजूरफाटामार्गे नाशिक रोडने पुढे जावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे कापूरबावडी जंक्शनवरून उजवे वळण घेऊन कशेळी आणि अंजूरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. तसेच मुंब्रा आणि कळव्याकडून येणाऱ्या जड वाहनांना खारेगाव टोल नाक्यावर थांबवण्यात येईल. त्यांनी खारेगाव खाडी पूल, खारेगाव टोल नाका आणि माणकोलीवरून अंजूरफाट्याकडे वळावे असे सांगण्यात आले आहे. नाशिककडून येणाऱ्या जड वाहनांना माणकोली नाक्यावरच अडवण्यात येईल आणि त्यांना माणकोली पुलाच्या खालून उजवे वळण घेऊन अंजूरफाटा मार्गे जावे लागेल.
नक्की वाचा: भरधाव कारची ट्रकला धडक आणि क्षणातच सर्व संपलं... चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा जागीच मृत्यू
लहान वाहनांच्या बाबतीतही मोठा बदल करण्यात आला आहे. ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीपासून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून म्हणजेच राँग साईडने पुढे सोडण्यात येईल. ही वाहने पुढे जाऊन फाऊंटन हॉटेलसमोर असलेल्या कटमधून आपल्या नियमित मार्गावर जाऊ शकतील. या काळात प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.