रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane News : कळवा खाडीत बुडणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाच्या दोन जवानांनी धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवला. याबाबत अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहनचालक गणेश गवारी यांचे धाडसी कामगिरी केल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच कौतुक केले आहे.
४ वर्षांचा हा चिमुकला धावत वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात आला आणि एक व्यक्ती पाण्यात बुडत असल्याची माहिती जवानांना दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरून जात असलेली अग्निशमन दलाची गाडी थांबवून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यात आले. या बचावकार्यात HC/2977 सोनवणे, HC/564 पाटील आणि HC/7044 पालवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 4 वर्षीय वरून निकाते याच्या प्रसंगावधानामुळे ही जीव वाचवणारी मदत वेळेत पोहोचू शकली.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास साकेत रोड परिसरातील खाडीत नौशाद मेहरूम (वय 30) हे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे एका चार वर्षाच्या चिमुरड्याने ही माहिती पोलिसांना दिली. वरुन निकाते असं या चिमुरड्याचं नाव असून तो कळवा खाडीतील जवळपासच्या झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती आहे. खेळण्यासाठी तो तिथं आल्याची शक्यता आहे. चिमुरड्याने तिथं एक तरुण बुडत असल्याचं पाहिलं. यानंतर अजिबात वेळ न दवडता तो पोलिसांकडे धावत गेला आणि त्यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर ठाणे नगर पोलीस, आपत्ती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे रेस्क्यू वाहन आणि जीप तैनात करण्यात आली.
दरम्यान, अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ खाडीत उडी घेतली. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर नौशाद मेहरूम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचेही प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अग्निशमन दलाच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.