विशाल पुजारी
विशाळगड अतिक्रमण वाद चिघळल्याची परिस्थिती आज रविवारी निर्माण झाली. संपूर्ण दिवसभर परिसरात तणावाचं वातावरण होतं. दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते. यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मोठं नुकसान जमावाकडून करण्यात आले. पोलिसांची ही सर्व परिस्थिती हाताळताना दमछाक झाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी राजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते. अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर काहींनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती. संभाजीराजे छत्रपती देखील स्वतः या पायथ्याशी बसलेले होते. ही पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाल्याचे देखील पाहायला मिळत होतं.
दुपारी बाराच्या सुमारास जमावाने आक्रमक भूमिका घेतली. गजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झालं. या परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली. काही वाहनांवर दगड घालण्यात आले होते. दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. काही घरांमध्ये प्रापंचिक वस्तू बाहेर फेकण्यात आल्या. या परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते. संतप्त जमावासमोर प्रत्येकजण हातबल झालेला होता.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
पोलीस प्रशासनांकडून सर्व जमावाला शांततेचा आवाहन करण्यात येत होतं. मात्र तरी देखील अचानक एका जमावाने आक्रमक भूमिका घेत परिस्थिती चिघळवली. दरम्यान पोलिसांनी लाठी चार्ज देखील केला. अनेक कार्यकर्त्यांची धर पकड करण्यात आली. शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्न ही केला गेला. मात्र संतप्त जमावासमोर प्रशासनाने देखील हात टेकले. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की या संपूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्याच्यावर कारवाई करणार. यापूर्वी काहींना नोटीस देखील दिली असल्याचं सांगितलं. सध्या ही सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे असेही पंडित म्हणाले.
संतप्त शिव भक्तांना शांत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होतं. जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्यासह पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित हे विशाळगडाच्या पायथ्याशी बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते. मात्र संपूर्ण परिसर घोषणाबाजी आणि विशाळगड अतिक्रमण मुक्ती व्हावी या मागणीवर कार्यकर्त्यांनी जोर धरलेला होता.
ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar : जीवात जीव आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार
संभाजीराजे छत्रपती यांनी देखील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे या भूमिकेशी ठाम होते. दरम्यान संभाजी राजे छत्रपती यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता, यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयावर चर्चा झाली. यानंतर संभाजी राजेंनी स्वतः सर्व शिवप्रेमींना अतिक्रमण हटवण्यात येणार अशी घोषणा केली. दरम्यान यावेळी संभाजीराजेंना अश्रू देखील अनावर झाले होते. सोमवारपासून विशाळगड परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. संभाजीराजेंच्या घोषणेनंतर संपूर्ण जमाव शांत झाला.
ट्रेंडिंग बातमी - सर्वोच्च न्यायालयाचा BMW ला दणका, 50 लाख देण्याचे आदेश, प्रकरण काय?
सकाळी सहा वाजल्यापासून विशाळगड परिसरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. मोठा पाऊस असताना देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. काही जण जखमी देखील झाले आहेत. जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी दाखल देखील करण्यात आलेले होते. संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास संपूर्ण संतप्त जमावाला शांत करण्यात प्रशासनाला यश आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world