अमोल सराफ, बुलडाणा
नवी मुंबईनंतर आता बुलढाणा जिल्ह्यातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मुलींच्या पालकांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, जळगाव जामोद पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
बेपत्ता मुलींची माहिती
तिन्ही अल्पवयीन मुली जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावच्या रहिवासी आहेत.
- तेजस्विनी गजानन वसुले- वय 16
- सानिका श्रीराम ताडे - वय 16
- चंचल श्रीकृष्ण मोहे - वय 16
(नक्की वाचा- VIDEO: 'त्या' बॉडीगार्डला पुतीन आयुष्यभर आठवतील; व्हिडीओची जगभरात होतेय चर्चा)
कशा बेपत्ता झाल्या मुली?
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली 'टेक्निकल क्लासला' जातोय असे घरी सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्या जळगाव जामोद बस स्थानकात त्यांच्या काही मैत्रिणींनाही दिसल्या होत्या. मात्र, त्यानंतर या तिन्ही मुली अचानक अज्ञात ठिकाणी बेपत्ता झाल्या.
मुली वेळेवर घरी न परतल्यामुळे पालकांनी चिंताग्रस्त होऊन त्यांची शोधाशोध सुरू केली. मुली कुठेच न आढळल्याने पालकांनी अखेरीस जळगाव जामोद पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली, पण मुलींचा कोणताही तपास लागला नाही.
(नक्की वाचा- Kalyan School: कल्याणमधील नामांकित शाळा रस्ता नसल्याने सलग 3 दिवस बंद; 3000 विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान)
मुलींना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान
एकाच वेळी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. नवी मुंबईनंतर आता बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर या मुलींना सुरक्षितपणे शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.