- मोसिन शेख/ छत्रपती संभाजीनगर
पावसासह आलेल्या वादळीवाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (21 एप्रिल) येथे मध्यरात्री अचानक वादळीवारे वाहू लागले, यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही घरांचे पत्रे उडूनही स्थानिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच जीवितहानी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. वादळीवाऱ्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 48 वर्षीय व्यक्तीसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. वादळीवाऱ्यामुळे अंगावर भिंत पडून शैलेंद्र तिडके (वय 48 वर्ष) यांचा मृत्यू झाला.
चिमुकल्याचे होते फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न
वादळीवाऱ्यामुळे स्थानिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांना गमवावे लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (20 एप्रिल) शहरामध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. यामध्ये एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला. दक्ष अभय वारे (वय 8 वर्ष) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. फुटबॉलपटू होण्याचे दक्षचे स्वप्न होते आणि हेच स्वप्न सत्यात उतवरण्यासाठी तो दर्गा परिसरात फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता. याचदरम्यान आलेल्या वादळीवाऱ्यामुळे उडालेला पत्रा लागून तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.
सोलर हीटर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
शिवाजीनगर परिसरात अदिती झा या चार वर्षांच्या मुलीच्या अंगावर सोलर हीटरची टाकी पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (20 एप्रिल) रात्री वादळीवारे वाहत असताना गारखेडा भागामध्ये घराच्या छतावर बसवलेली सोलर हीटरची टाकी उडाली आणि शेजारच्या घरामध्ये राहणाऱ्या अदितीच्या अंगावर पडली. या घटनेमध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती, तिला रुग्णालयामध्ये नेले जात असतानाच वाटतेच तिचा मृत्यू झाला. दरम्यान सोमवारीच अदितीचा चौथा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईक देखील घरी आले होते.
वाढदिवसाऐवजी अदितीचा अंत्यविधी करण्याची वेळ आपल्यावर येईल, याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. अदितीच्या निधनामुळे झा कुटुंबीय कोलमडले आहे.
VIDEO: वाढत्या उष्णतेमुळे वैयक्तिक आयुष्यात वादळ, मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक वास्तव