योगेश पाटील, प्रतिनिधी
Tipu Sultan Controversy: छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना होऊ शकते का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कोणत्याही सामान्य माणसासाठी नाही असेच असेल. मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या दोघांची तुलना करत दोघेही एकसमान असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
ज्या टिपूने मराठा साम्राज्यावर वारंवार हल्ले केले, हिंदूंचा वारंवार छळ केला, त्या टिपू सुलतानची तुलना थेट शिवरायांशी केल्याने आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे तापले असून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल करत त्यांनी सपकाळांनी तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
या वादग्रस्त वक्तव्याचे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीलाही आता उत्तर देणे कठीण झाले आहे.
( नक्की वाचा : Malegaon News: टिपू सुलतानच्या मुद्यावर मालेगाव पेटले! शिवसेनेच्या इशाऱ्याला उपमहापौरांचं उत्तर, वाद चिघळणार? )
मालेगाव महानगरपालिकेतील फोटोवरून वादाची ठिणगी
या संपूर्ण वादाची सुरुवात मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या कार्यालयातून झाली. नवनियुक्त उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता.
या निर्णयामुळे मालेगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. हिंदू संघटनांच्या वाढत्या दबावानंतर अखेर प्रशासनाला तो फोटो तेथून हटवावा लागला. मात्र हा स्थानिक वाद आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानामुळे राज्यभर पसरला आहे.
( नक्की वाचा : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )
टिपू सुलतान संदर्भातील जुने वाद
टिपू सुलतानच्या नावावरून महाराष्ट्रात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मीरा रोड आणि धुळ्यातील एका चौकाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून शिवसेना आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच 2022 मध्ये मुंबईतील मालाडमधील एका मैदानाला आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते टिपू सुलतानचे नाव देण्यात आले होते, तेव्हाही भाजपने मोठे आंदोलन केले होते. टिपू सुलतानच्या नावावरून वारंवार होणाऱ्या या वादांमुळे राज्यातील वातावरण नेहमीच संवेदनशील राहिले आहे.
इतिहास काय सांगतो?
ऐतिहासिक संदर्भांनुसार टिपू सुलतान हा 18 व्या शतकातील म्हैसूरचा शासक होता. त्या काळात मराठा साम्राज्य आणि टिपू सुलतान यांच्यात अनेक मोठ्या लढाया झाल्या होत्या. टिपू सुलतानने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत आक्रमणे केली होती, ज्यामध्ये हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याच्या नोंदी आहेत. अशा ऐतिहासिक शत्रूची तुलना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने आता सपकाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता सपकाळ माफी मागून हा वाद शांत करतात की हे रान आणखी पेटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world